मुरैना - आतापर्यंत छापेमारी दरम्यान तुम्ही पैसै, सोने सापडल्याची बातमी पाहिली असेल. मात्र, मध्यप्रदेशात एका व्यक्तीने आपल्या घराच्या छतावर सात ट्रॉली कचरा आणि 15 ड्रम लिंबूची साल साठवून ठेवल्याचा प्रकार समोर आला ( Garbage Collection Craze In Morena ) आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयला तक्रार केल्यानंतर नगरपरिषदेने जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने साफ सफाईला सुरुवात केली आहे.
मध्यप्रदेशातील मुरैना येथील योगेशपाल गुप्ता हे आपल्या तीन मजली इमारतीत ( Madhyapradesh Morena Yogeshpal Gupta ) राहतात. ते रोज सकाळी उठून गल्लीतील कचरा साफ करतात. मात्र, तो कचरा कचरा गाडीत न टाकता पॉलिथिन बॅगमध्ये भरुन आपल्या घरी आणतात. तसेच, जेव्हाही ते बाजारात जातात तेव्हा कचरा आणि खरकटे सोबत आणतात. खूप वर्षापासून त्यांनी ही सवय असल्याचे सांगण्यात येत आहे.
जनसुनावणी केली तक्रार
मागील काही दिवसांपासून योगेशपाल गुप्ता यांच्या घरावरुन नागरिकांना दुर्गंधी सुटल्याचा वास आला. जेव्हा नागरिकांनी घरावरुन पाहिले तेव्हा कचऱ्याचे ढिगारे पाहून ते चकीत झाले. कचरा सडल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. त्याची तक्रार त्यांनी जनसुनावणीमध्ये केली. त्यानंतर नगरपरिषदेचे कर्मचारी गुप्तांच्या घरी गेले तेव्हा तेथील कचरा पाहून तेही चक्रावले. हा कचरा उचलण्यासाठी चार ट्रॅक्टर बोलवण्यात आले.
गुप्ता मानसिक रोगी नाहीत पण...
नगरपरिषदेचे आरोग्य अधिकारी जगदीश टैगौर म्हणाले की, कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत चार ट्रॅक्टर कचरा उचलला आहे. अजूनही काही कचरा राहिला आहे. सायंकाळ झाल्याने कारवाई थांबवली होती, राहिलेला कचराही उचलला जाणार आहे. गुप्ता हे मागील काही वर्षापासून कचरा गोळा करत होते. ते मानसिक रोगी नाही आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितल्यानुसार, कचरा गोळा करण्याची त्यांना सवय झाली आहे.
हेही वाचा - Mekedatu Padayatra : काँग्रेसला पदयात्रा बंद करण्याचे कर्नाटक राज्य सरकारचे आदेश