कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पेगासस हेरगिरी प्रकरणावरून टीका केली. पेगासस हेरगिरी ही वॉटरगेटपेक्षाही भंयकर आहे, असे त्या पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे भेटण्यासाठी वेळ मागितला असून लवकरच त्यांची भेट घेणार असल्याचे ममतांनी सांगितले.
बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ममता आणि पीएम मोदी यांची थेट असणारी ही पहिलीच बैठक होणार आहे. पेगासस हेरगिरी ते माध्यमांवरील छापेमारीवरून ममता बॅनर्जी यांनी केंद्रावर टीका केली. 'पेगासस हेरगिरी प्रकरण वॉटरगेटपेक्षा भंयकर आहे'. आपत्कालीन परिस्थितीपेक्षा ही मोठी आणीबाणी आहे. सुपर आणीबाणी आहे, असे ममता म्हणाल्या.
'मी दोन-तीन दिवसांत दिल्लीला जाणार आहे. जर वेळ दिला तर मी राष्ट्रपतींनाही भेटेल. पंतप्रधानांनी मला वेळ दिला आहे, त्यांची भेट घेईल, असे त्यांनी सांगितले. पश्चिम बंगालमधील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरही ममता यांनी केंद्राच्या भूमिकेविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
कोरोनावर नियंत्रण ठेवल्याबद्दल योगी आदित्यनाथ सरकारचे पंतप्रधानांनी कौतुक केल्यावरून ममतांनी सरकारवर हल्लाबोल केला. ,यूपीमधील नद्यांमध्ये मृतदेह वाहात आहेत आणि पंतप्रधान म्हणतात, उत्तर प्रदेश हे सर्वोत्तम राज्य आहे. लाज वाटली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
यापूर्वी 21 जुलै रोजी शहीद दिनाला संबोधित करताना ममता यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. भाजपा सरकारने देशातील संघराज्य पद्धती नष्ट केल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच भाजपाला सत्तेतून बाहेर हाकलत नाही, तोपर्यंत 'खेला' होणार, असे त्या म्हणाल्या होत्या. पेगॅससमुळे मी माझा फोनच प्लास्टर करून टाकला आहे. केंद्र सरकारला देखील प्लास्टर लावून टाकलं पाहिजे. नाहीतर देश बरबाद होऊन जाईल, असेही त्यांनी म्हटलं होते.