कोलकाता - नुकतेच पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका पार पडल्या असून तृणमूल काँग्रेसने दोनशेहून अधिक जागा मिळाल्या. भाजपाचा पराभव करत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्या आहेत. नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात मात्र ममता बॅनर्जी यांना पराभव पत्करावा लागला होता. नंदीग्राम निवडणूक निकालाविरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कलकत्ता उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या प्रकरणी शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
ममता बॅनर्जी यांनी सुवेंदू अधिकारी यांच्याविरोधात कलकत्ता उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली आहे. शुक्रवारी एकल खंडपीठापुढे हे प्रकरण सुनावणीसाठी सूचीबद्ध केले गेले आहे. न्यायमूर्ती कौशिक चंद यांच्या न्यायालयासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे यावर सुनावणी होणार आहे. ईव्हीएम मशीनसोबत छेडछाड आणि निकाल जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी फेरमोजणीची मागणी फेटाळून लावल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने धुळदाण उडवली होती. प्रचंड अटीतटीच्या झालेल्या लढतीत नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींना पराभव पत्करावा लागला. भाजपाचे सुवेंदु अधिकारींनी ममतांचा 1736 मतांनी पराभव केला. आधी ममतांनी 1200 मतांनी विजयी घोषित करण्यात आले होते. मात्र, पुर्नमतमोजणीत ममता बॅनर्जी यांचा 1736 मतांनी पराभव झाला होता. राज्यात निर्विवादपणे एकहाती सत्ता मिळवणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या नंदीग्राममधील पराभवानंतर गड आला पण सिंह गेला अशी स्थिती झाली.
विरोधी पक्षनेते आहेत सुवेंदू अधिकारी -
ममतांचे सेनापती म्हणून सुवेंदू यांची ओळख होती. दीदींचे उत्तराधिकारी असेही सुवेंदू यांना म्हटलं जात. मात्र, ममतांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या उदयानंतर तृणमूलमध्ये त्यांचे महत्त्व कमी झाले. यावर ते नाराज होते. अखेर टीएमसीला सोडचिठ्ठी देत त्यांनी भाजपात प्रवेश केला. यानंतर तृणमूलने त्यांना गद्दार असेही संबोधले. सध्या सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगाल विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत.