कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी प्रचाराचा शंख फुंकला. यावेळी त्यांनी आपण नंदीग्राम मतदरासंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणाही केली. विशेष म्हणजे या मतदारसंघातून २०१६मध्ये सुवेंदू अधिकारी हे तृणमूलच्या तिकीटावरुन निवडून आले होते. मात्र, आता त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
दुसऱ्या पक्षात जाणाऱ्यांवर साधला निशाणा..
यावेळी नंदीग्राममधील प्रचारसभेत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की तृणमूलमधून बाहेर पडलेल्या नेत्यांबाबत आपण चिंता करत नाही, कारण जेव्हा तृणमूलची स्थापना झाली होती, तेव्हा यांपैकी कोणीही त्यात सहभागी नव्हते. गेल्या काही वर्षांमध्ये या नेत्यांनी जनतेकडून लुटलेला पैसा सुरक्षित रहावा यासाठीत या लोकांनी पक्ष सोडला आहे, अशी बोचरी टीकाही त्यांनी यावेळी केली.
नंदीग्राम ही लकी जागा..
विधानसभा निवडणुकांसाठी मी नेहमीच नंदीग्राममधून प्रचाराची सुरुवात केली आहे. ही जागा माझ्यासाठी लकी आहे. त्यामुळे यावर्षी मला वाटतं, मी इथूनच निवडणूक लढवावी. आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुब्रता बक्षी यांना मी विनंती करते, की त्यांनी या मतदारसंघासाठी माझ्या नावाचा विचार करावा, असे त्या म्हणाल्या. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या बक्षींनी ही विनंती मान्य केली.
तसेच, सध्या भवानीपोरे येथून आमदार असलेल्या ममतांनी, शक्य झाल्यास आपण भवानीपोरे आणि नंदीग्राम या दोन्ही ठिकाणाहून निवडणूक लढवू असेही सोमवारी म्हटले. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका या एप्रिल-मे मध्ये होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : ठाकरेंच्या वक्तव्यानंतर कर्नाटकात रोष; मुख्यमंत्र्यांसह विरोधकांनीही केला निषेध