नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसच्या पारंपरिक दलित मतपेटीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे 5 जुलैपासून 212 निवडक विधानसभा आणि 61 लोकसभा मतदार संघांमध्ये दलितांना जोडण्यासाठी नॅशनल लीडरशिप डेव्हलपमेंट मिशन (LDM) ही मोहीम सुरू करणार आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये काँग्रेसने मल्लिकार्जुन खर्गे यांची काँग्रेस पक्षाध्यक्षपदी निवड केली होती. काँग्रेस पक्षात संसदीय लोकशाही असल्याचेच या निवडीतून काँग्रेसने दाखवून दिले होते.
नॅशनल लीडरशिप डेव्हलपमेंट मिशन : काँग्रेस पक्षापासून दलित दुरावल्याची स्थिती गेल्या काही वर्षापासून पुढे येत आहे. त्यामुळे काँग्रेसने मल्लिकार्जुन खर्गे यांची पक्षाध्यक्षपदी निवड केल्यानंतर दलित मतपेटीला आकर्षित करण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. मल्लिकार्जुन खर्गे हे 5 जुलैला नॅशनल लीडरशिप डेव्हलपमेंट मिशन (LDM) लाँच करणार आहेत. आम्ही या कार्यक्रमावर काम करत असून ही योजना आजपासून सुरू होत असल्याचे एससी, एसटी, ओबीसी सेलचे राष्ट्रीय समन्वयक के राजू यांनी ईटीव्ही भारतला सांगितले आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांच्याहस्ते आज अॅप लॉन्च करण्यात येणार असून त्याद्वारे या योजनेचे निरीक्षण केले जाईल, असेही के राजू यांनी यावेळी स्पष्ट केले.
राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि तेलंगणामध्ये योजना : नॅशनल लीडरशिप डेव्हलपमेंट मिशन LDM ही दीर्घकालीन योजना आहे. मात्र ती राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि तेलंगणा या चार राज्यांमधील 212 राखीव विधानसभा जागांवर सुरू केली जाणार असल्याची माहिती के राजू यांनी दिली. या चारही राज्यात यावर्षी निवडणुका होणार आहेत. 2024 मध्ये निवडणुका होणार्या 61 राखीव लोकसभा मतदार संघांमध्येही ही योजना सुरू केली जाईल. 61 राखीव लोकसभा जागेवर 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होती. त्यामुळे लोकसभा निवडणूक 2024 मध्येही पक्ष तिथे जोमाने लढणार आहे.
लोकसभेच्या 61 जागेवर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर : लोकसभा निवडणूक 2019 मध्ये काँग्रेस तब्बल 61 जागांवर दुसऱ्या क्रमांकावर होती. त्यामुळे या जागांवर लोकसभा निवडणूक 2024 मध्ये काँग्रेस जोमाने लढणार आहे. या जागा कोणत्याही जागा वाटपाच्या अंतर्गत येणार नाहीत. काँग्रेस तेथे 2024 च्या निवडणुकीत निवडणूक लढवेल, असेही के राजू यांनी स्पष्ट केले. नॅशनल लीडरशिप डेव्हलपमेंट मिशन LDM ची कल्पना 2022 च्या चिंतन शिविरादरम्यान पुढे आली. त्यानंतर उदयपूर येथील कार्यक्रमात योजनेला काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी संमत केले. आता ही योजना 2024 च्या राष्ट्रीय निवडणुकांपूर्वी काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी एक रोडमॅप ठरणार असल्याचेही के राजू यांनी यावेळी स्पष्ट केले.
काय आहे एलडीएम योजनेचा उद्देश : नॅशनल लीडरशिप डेव्हलपमेंट मिशन LDM या योजनेचा उद्देश काँग्रेसच्या सामाजिक न्याय अजेंडाचा देशभरात विस्तार करणे हा आहे. त्यामुळे एलडीएमचे समन्वयक गाव आणि ब्लॉक स्तरावर नेमण्यात येणार आहेत. हे समन्वयक स्थानिकांसोबत काम करुन त्यांचे प्रश्न मांडतील. स्थानिक नागरिकांचे प्रश्न सोडवून त्यांचा विश्वास जिंकतील. यातून विधानसभेच्या जागा जिंकण्यासाठी ते काँग्रेससाठी मैदान तयार करतील. परंतु उमेदवार निवडीत त्यांची कोणतीही भूमिका असणार नाही, असेही के राजू म्हणाले.
हेही वाचा -