शिमला - हिमाचल प्रदेशमधील सिरमौर जिल्ह्यात एक हृदयाचे ठोके वाढवणारी अपघाताची घटना घडली. येथील बोहराड परिसरातील एका घाटात घडलेल्या अपघातामध्ये बस चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली आहे. अनियंत्रित झालेली बस घाटातून दरीत कोसळण्याची घटना टळली, मात्र, अपघातग्रस्त कठड्यावर लटकत राहिल्याचा प्रकार घडला. यावेळी वाहन चालकाने सतर्कता दाखवत ब्रेक दाबून बस खाली कोसळण्यापासून रोखून धरली त्यानंतर सर्व प्रवासी सुखरुपपणे बसच्या बाहेर आले. बस मध्ये एकूण 24 प्रवासी होते.
सिरमौर जिल्ह्यात एक खासगी प्रवासी बस पांवटा साहिब येथून शिलाईकडे जात होती. बस कफोटापासून 10 किमी अंतरावर घाटात पोहोचली त्यावेळी अचानक बसचा रॉड तटुला आणि ती बस अनियंत्रित झाली. त्यामुळे बस थेट दरीच्या कठड्यावर चढली आणि दरीमध्ये झुकली. त्याचवेळी चालकाने जोराचा ब्रेक लावल्याने अर्धी बस हवेत तरंगत राहिली. हा प्रकार पाहून सर्व प्रवाशांच्या काळजाचा ठोकाच चुकला.
शेवटचा प्रवासी उतरेपर्यंत ब्रेकवर पाय-
दरीत कोसळणारी बस चालकाने ब्रेकच्या साहाय्याने रोखून धरली. त्याचवेळी त्याने सर्व प्रवाशांना बाहेर उतरण्यास सांगितले. एक एक प्रवासी जीव मुठीत घेऊन बसच्या बाहेर रोडवर उतरले. तोबर बस हवेतच हेलकावे खात होती. मात्र, बसचा चालक सर्व प्रवासी उतरेपर्यंत ब्रेकवर पाय देऊन तिथेच उभा होता, अशी माहिती खाली उतरलेल्या प्रवाशांनी दिली.
चालकालाही वाचवले-
या लटकत्या बसमधून सर्व प्रवासी सुखरुप खाली उतरल्यानंतर चालका वाचवण्यासाठी प्रवाशांनी बस रोखून धरण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या जीवघेण्या परिस्थितीत सर्व प्रवाशांनी चालकाला बाहेर काढण्यासाठी बसच्या टायरला मोठ्या दगडांच्या उट्या लावल्या आणि बस रोखून धरली. त्यानंतर चालक सुखरुपपणे बाहेर आला. या घटनेत चालकाने स्वत:चा जीव धोक्यात घालून सर्वांचा जीव वाचवल्याने त्याचे सर्वांकडून कौतुक होत आहे.