विदिशा (मध्य प्रदेश) - जिल्ह्यातील गंजबासौदाच्या लाल पठार परिसरात घडलेल्या एका घटनेत ४० हून अधिक जण विहिरीत पडले. यात चौघांचा मृत्यू झाला आहे. तर २५ जणांना वाचवण्यात आले आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीमकडून बचाव कार्य सुरू आहे. मृत्यूची माहिती मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ट्विटद्वारे दिली. दरम्यान, शिवराजसिंह चौहान यांच्या आदेशावरून राज्यमंत्री विश्वास सारंग घटनास्थळी उपस्थित आहेत.
विदिशा येथे घडलेल्या विहीर दुर्घटनेत आतापर्यंत एकूण 4 जणांचे मृतदहे हाती लागले आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या वारशांना मुख्यमंत्री चौहान यांनी पाच लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे. तसेच जखमींना 50 हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे.
काय आहे घटना
मिळालेल्या माहितीनुसार, लाल पठार परिसरात पाणी योजनेअंतर्गत बांधलेली एक जूनी विहीर आहे. त्या विहिरीवर छत होते. ते छत उघडून त्या परिसरातील मुलं विहिरीत आंघोळ करत असतं. गुरूवारी काही मुले त्या विहिरीत आंघोळीसाठी गेली. तेव्हा त्यातील एक मुलगा पाण्यात बुडाला. त्यावेळी त्या मुलाला वाचवण्यासाठी परिसरातील काही लोकांनी विहिरीत उडी टाकली. तर काही लोक त्या विहिरीच्या कडेवर उभे राहून ही घटना पाहत होते.
विहिरीच्या भोवती गर्दी वाढली. सर्व लोक विहिरीभोवती बांधण्यात आलेल्या कठड्यावरून वाकून विहिरीत पडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी सुरू असलेला प्रयत्न बघत होते. मात्र, हा भार विहिरीच्या कठड्याला पेलवला नाही आणि अचानक कठडा ढासळला. कठडाच ढासळल्यानंतर त्याला रेटून उभे असलेले अनेकजण एकाच वेळी विहिरीत पडले.
जवळपास ४० हून अधिक जण त्या विहिरीत पडल्याचा अंदाज आहे. यात चौघांचा मृत्यू झाला आहे. तर २५ जणांना या घटनेत वाचवण्यात आले असून बचाव कार्य अद्याप सुरू आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ टीमकडून बचाव कार्य सुरू आहे.
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केलं दु:ख
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या घटनेबाबत ट्विट करत दु:ख व्यक्त केले. तसेच त्यांनी या घटनेची उच्चस्तरीय समिती गठित करून चौकशीचे आदेश दिले आहेत. याशिवाय त्यांनी घटनेतील जखमींच्या उपचारासाठी आवश्यक ती सर्व मदत करावी, असे निर्देश दिले आहेत.
घटनेची गंभीरता ओळखत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कंट्रोल रूम तयार करण्याचे आदेश पारित केले आहेत. संपूर्ण ताकतीने प्रशासन बचाव कार्य करत आहे. मी सतत कंट्रोल रुमच्या संपर्कात असून आम्ही सर्व उपाय करत रेस्कू ऑपरेशन करू, असे शिवराज सिंह यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान गुरूवार रात्री ९ वाजता दिल्लीसाठी रवाना होणार होते. त्याआधी गंजबासौदा येथे ही घटना घडली. यामुळे शिवराज सिंह चौहान यांनी दिल्लीचा दौरा रद्द करत मध्य प्रदेश न सोडण्याचा निर्णय घेतला. शिवराजसिंह चौहान दिल्लीमध्ये ग्वालियरसाठी सुरू होणाऱ्या फ्लाइटचे वर्चुअल उद्धाटन कार्यक्रमाला उपस्थितीत राहण्यासाठी दिल्लीला निघाले होते.
हेही वाचा - एटीएममधून पैसे नव्हे, घ्या धान्य; हरियाणाची देशात पहिल्यांदाच अभिनव योजना
हेही वाचा - कोरोनाची दुसरी लाट संपली नाही, डेल्टा प्लस कदाचित धोकादायक नसेल-एन. के. अरोरा