चेन्नई : महाराष्ट्रातील एका विद्यार्थ्याने आयआयटी मद्रासच्या कॉलेज कॅम्पसमध्ये आत्महत्या केली आहे. कोरट्टूर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. श्रीवन सनी वय 25 मूळचा महाराष्ट्राचा आहे. तो आयआयटी, कोट्टूरपुरम, चेन्नई येथे एमएस इलेक्ट्रिकलच्या द्वितीय वर्षात शिकत होता. आयआयटी कॅम्पसमधील महानदी वसतिगृहात शिकणाऱ्या श्रीवन सनी याने काल १३ फेब्रुवारी रात्री वसतिगृहाच्या खोलीत आत्महत्या केली.
मुंबई आयआयटीतही झाली होती आत्महत्या : 12 फेब्रुवारी आयआयटी मुंबईच्या पवई येथील कॅम्पसमध्ये एका १८ वर्षीय विद्यार्थ्याने त्याच्या वसतिगृहात आत्महत्या केल्याची घटना घडली होती. पोलिस चौकशीत कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. मात्र कॅम्पसमध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांशी भेदभाव केल्यामुळे त्याने आत्महत्या केली, असा आरोप एका विद्यार्थी गटाने केला आहे. हा विद्यार्थी मुळचा अहमदाबादचा रहिवासी होता.
आयआयटी व्यवस्थापनाला दिली माहिती : सहकारी विद्यार्थ्यांनी याची माहिती आयआयटी व्यवस्थापनाला दिली. आयआयटी प्रशासनाच्या वतीने वसतिगृह व्यवस्थापकाने कोट्टूरपुरम पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी श्रीवन सनी या मृत विद्यार्थ्याचा मृतदेह ताब्यात घेऊन रायपेट रुग्णालयात पाठवला. तसेच पोलिसांनी आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. त्यानंतर प्राथमिक तपासात श्रीवण सनी या विद्यार्थ्याने गेल्या दोन महिन्यांपासून संशोधन वर्गाला नीट हजेरी लावली नव्हती आणि त्यामुळे आलेल्या मानसिक तणावाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
माथंगकन्नी वसतिगृहाच्या खोलीत आत्महत्येचा प्रयत्न : आयआयटीमध्ये बीटेक द्वितीय वर्षात शिकत असलेल्या कर्नाटकातील विवेक वय 21 या विद्यार्थ्याने काल रात्री राहत्या माथंगकन्नी वसतिगृहाच्या खोलीत आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर सहकारी विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या खोलीत बेशुद्ध पडलेल्या विवेकला बाहेर काढले आणि उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. कोट्टूरपुरम पोलिसांनी गुन्हा दाखल करून घटनेचा तपास केला असता विवेक हा विद्यार्थी तणावाखाली असल्याने अभ्यासात नीट लक्ष केंद्रित करू शकत नसल्याचे समोर आले.
कॅम्पसमध्ये धरणे आंदोलन : एकाच दिवशी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने आणि एका विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने, प्राध्यापकांच्या दबावामुळे विद्यार्थी नैराश्यात असल्याचे सांगत सहकारी विद्यार्थ्यांनी आयआयटी कॅम्पसमध्ये धरणे आंदोलन केले. तसेच, या दोन घटनांसंदर्भात विद्यार्थ्याच्या वसतिगृहातील पत्र पोलिस विभागाने जप्त केले. पुढील तपास सुरू आहे. त्याचवेळी आयआयटीच्या विद्यार्थ्यांची समितीही यासंदर्भात चौकशी करत आहे.
हेही वाचा : Crime News : व्हॅलेंटाईन डेला गिफ्ट देण्यासाठी पैसे नव्हते म्हणून या पठ्ठ्याने चोरल्या बकऱ्या