जामताडा (झारखंड) - महाराष्ट्र पोलिसांनी राज्यातील एका सुरक्षा रक्षकाच्या खात्यातून सायबर क्राईमच्या माध्यमातून लाखो रुपये लंपास करणाऱ्या गुन्हेगारांना जामताडामधून अटक केली आहे. या आरोपीचे नाव अर्जून दास आहे. महाराष्ट्रात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या वेंकटेश्वर राव यांच्या बँक खात्यातून लाखो रुपये लंपास झाले होते. महाराष्ट्र पोलिसांनी स्थानिक जामताडा पोलिसांच्या मदतीने या आरोपीला ताब्यात घेतले. आरोपी डुमरियाचा रहिवाशी आहे.
३ लाख ७० हजार रुपये केले लंपास -
पोलिसांनी अटक केलेल्या अर्जून दास नावाच्या आरोपीने बँक अधिकारी बनून वेंकटेश्वरा राव यांच्या खात्यातून टप्प्या-टप्प्याने ३ लाख ७० हजार रुपये लांबवले. ही चोरी असल्याचे लक्षात येताच सुरक्षा रक्षकाने तक्रार केली आणि महाराष्ट्र पोलिसांनी जामताडातून आरोपीला अटक केली.
अभ्योदय बँकेच्या नावावर केली फसवणूक -
पीडित सुरक्षा रक्षक वेंकटेश्वर राव यांनी अभ्योदय बँकेत क्रेडीट कार्डसाठी ऑनलाइन अर्ज केला होता. त्यानंतर त्यांना अरविंद नावावरून 8004655697 या मोबाईल क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला बँक अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपीने वेंकटेश्वर राव यांना एक ओटीपी पाठवला. वेंकटेश्वर यांनी ओटीपी सांगताच त्याच्या खात्यातून ५० हजार रुपये काढून घेतले. वेंकटेश्वर यांनी जेव्हा आरोपीला खात्यातून रक्कम वजा झाल्याचे सांगितले तेव्हा आरोपीने पैसे सांयकाळी तुमच्या खात्यात जमा होतील, असे सांगितले. त्यानंतर अनेकदा त्याने वेंकटेश्वर यांच्या खात्यातून पैसे लांबवले.
पोलिसांच्या चौकशीत वेंकटेश्वर यांच्या खात्यातून पाटना येथील एका खात्यात पैसे जमा झाल्याचे समोर आले. तर, आरोपीचे लोकेशन हे जामताडा जिल्ह्यातील करमाटांड पोलीस स्थानकाच्या हद्दीत होते. त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी जामताडा पोलिसांच्या मदतीने आरोपीला अटक केली आणि न्यायालयाकडून ट्रांजिट रिमांडवर महाराष्ट्रात आणले.
हेही वाचा -गावठी बॉम्बच्या अफवेने जयसिंगपूरमध्ये खळबळ