छिंदवाडा (मध्य प्रदेश) - सौंसर वाळू खदानीतून वाळूची अवैध तस्करी करणाऱ्या टोळीला महाराष्ट्रातील वरुड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत वाळूचे 35 डंपर हस्तगत करण्यात आले आहेत. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या वर्धा नदीजवळ ही कारवाई केली. विशेष म्हणजे पांढुर्णा येथील अधिकाऱ्यांच्या समोरुन रेतीचे ट्रक जात असताना देखील कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.
सौंसर येथून पांढुर्णामार्गे सर्रासपणे वाळूची तस्करी केली जात आहे मात्र तरीही पांढुर्णा पोलिस यावर कारवाई का करत नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
पांढुर्णा पोलीस गप्प का ?
महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर आता पांढुर्णातील जबाबदार अधिकाऱ्यांना चांगलीच चपराक बसल्याचे बोलले जात आहे. दिवसाढवळ्या पांढुर्णा पोलिसांच्या नजरेसमोर वाळूची वाहतूक होते मात्र तरीही आत्तापर्यंत पांढुर्णा पोलिसांनी यावर कारवाई का केली नाही,असा प्रश्न सध्या पडत आहे. दरम्यान पांढुर्णा पोलिसांवर राजकीय दबाव असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
35 वाळूची डंपर आणि चार कार जप्त
वरुड पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार अमरावती पोलीस अधीक्षक श्रीहरी बालाजी एन, उपविभागीय अधिकारी कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनात आयपीएस अधिकारी श्रनिक लोध यांनी त्यांच्या 21 जणांच्या टीमने वर्धा नदीवरील चेक पोस्टवर पाळत ठेवून ही कारवाई केली. त्यांनी यावेळी 35 डंपरसह चार कार जप्त केल्या आहेत.