कोटद्वार ( उत्तराखंड ) : महाराष्ट्रातील लातूर येथील डॉ. हरिवंशराय बच्चन प्रबोधन प्रतिष्ठान (HBPP) ने देशातील पहिले CDS दिवंगत बिपिन रावत ( CDS Late Bipin Rawat ) यांचे मूळ गाव बिरमोली दत्तक घेतले आहे. बिरमोली सोबतच स्वयंसेवी संस्थेने बिरमोली ग्रामपंचायत अंतर्गत सायना आणि मथरा महसुली गावे देखील दत्तक घेतली आहेत. ही दोन्ही गावे बिरमोली ग्रामसभेच्या अंतर्गत येतात.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सीडीएस बिपिन रावत यांच्या सायना या गावाला राष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा संस्थेचा संकल्प आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात दिवंगत सीडीएस बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांना मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर शाळेतील मुलांना सायकल व टॅब आदींचे वाटप करण्यात आले.
डॉ. हरिवंशराय बच्चन प्रबोधन प्रतिष्ठानची टीम सीडीएसच्या गावात पोहोचली. त्यांनी तेथील प्रशासन, गावप्रमुख आणि इतर लोकप्रतिनिधींची भेट घेतली. संस्थेतर्फे बिरमोलीमध्ये जनरल बिपीन रावत हॉस्पिटलचे बांधकाम, लेफ्टनंट जनरल लक्ष्मणसिंह रावत इंटर कॉलेज, श्रीमती मधुलिका रावत बालिका सैनिक स्कूल आणि विविध विकासकामे करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.