बंगळुरू : हुतात्मा दिनादिवशीच महाराष्ट्राच्या आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकरांना कर्नाटक पोलिसांनी अडवल्याची घटना घडली आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी आपले प्राण दिलेल्या महाराष्ट्र एकीकरण समीतीच्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ते बेळगावीला जात होते. यावेळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर निपाणी येथील कोगनोली टोलनाक्यावर त्यांना अडवण्यात आले.
"बेळगाव आमच्या हक्काचं..." कार्यकर्त्यांची घोषणाबाजी..
यड्रावकरांसोबत यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अनेक सदस्यही होते. पोलिसांनी अडवल्यानंतर "आम्ही श्रद्धांजली वाहण्यासाठी जात आहोत, त्यामुळे तुम्ही आम्हाला रोखू शकत नाही" असेही या कार्यकर्त्यांनी पोलिसांना सांगितले. मात्र, आम्ही तुम्हाला पुढे जाऊ देऊ शकत नसल्याचे म्हणत पोलिसांनी सर्वांना तिथेच अडवून ठेवले. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी "बेळगाव आमच्या हक्काचं; नाही कुणाच्या बापाचं" अशा घोषणाही दिल्या.
राज्याचे दहा सुपुत्र झाले होते हुतात्मा..
१९५६ मध्ये आजच्याच दिवशी, बेळगाव, कारवार, बिदरसारखी मराठी गावे तत्कालिन म्हैसूर राज्याला अन्यायकारक पद्धतीने जोडण्यात आली. सीमाभागातील मराठी बांधवांवर व महाराष्ट्र राज्यावर त्यावेळी झालेला अन्याय दूर करण्यासाठी मराठी बांधवांचा लढा अखंड सुरु आहे. हा लढा यशस्वी होईपर्यंत समस्त मराठी बांधव सर्वशक्तीनिशी, एकजुटीनं लढतील. संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या आंदोलकांवर, दि. 18 जानेवारी 1956 रोजी मुंबईत गोळ्या चालवण्यात आल्या होत्या. त्यात महाराष्ट्राचे १० सुपुत्र शहीद, तर अडीचशेहून अधिक जण जखमी झाले होते.
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली..
हुतात्मा दिनानिमित्त आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील हुतात्म्यांना विनम्र अभिवादन केले. कर्नाटक व्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही मुख्यमंत्र्यांनी आपल्या अभिवादनात केला. कर्नाटक सीमा भागातलं शेवटचं मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत सर्वशक्तीनिशी व निर्धारानं लढत रहाणं हीच हुतात्म्यांना श्रद्धांजली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले.
हेही वाचा : कर्नाटकव्याप्त सीमाभाग महाराष्ट्रात आणणारच, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा निर्धार