लखनऊ: लखनऊमध्ये विद्यार्थिनीला ऑटोमध्ये नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार (lucknow gang rape) करणाऱ्या मुख्य आरोपी इमरान उर्फ मुस्तफाचा पोलीसांनी इनकाउंटर केला आहे. (lucknow gang rape encounter). रात्री उशिरा पोलिस आणि इम्रान यांच्यात चकमक झाली. चकमकीत इम्रानच्या पायाला गोळी लागली होती. या घटनेनंतर पोलीस इम्रानचा शोध घेत होते.
घटनास्थळी झाली चकमक: इम्रान हा गोमती नगर येथील कथोटा तलाव परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर तेथील पोलीस सतर्क झाले. काथोटा तलावाजवळ पोलिसांना पाहून इम्रानने घटनास्थळाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग केला असता इम्रानने गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात इम्रानच्या पायाला गोळी लागली. डीसीपी इस्ट प्राची सिंह यांनी सांगितले की, इम्रानकडून एक पिस्तूल आणि काही काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. घटनेनंतरच पोलीसांनी इम्रानची ओळख पटवली व त्याच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू होते.
आरोपी आहे ऑटोचालक: डीसीपी इस्ट प्राची सिंह यांनी सांगितले की, इम्रानच्या अटकेसाठी त्याच्या छायाचित्रांसह पॅम्प्लेटही वाटण्यात आले होते. रात्री साडेतीनच्या सुमारास पोलिस आणि आरोपींमध्ये चकमक झाली. यावेळी गुन्हे शाखेचे पथक व विभूती पोलीस ठाण्याचे पथक उपस्थित होते. पोलिस अधिकार्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी इम्रान नानपारा हा बहराइचचा रहिवासी आहे आणि तो लखनौच्या विभूती खांड पोलिस स्टेशन हद्दीत ऑटोचालक म्हणून काम करतो. त्यानेच विद्यार्थिनीचे ऑटोमध्ये बसवून अपहरण केले आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला.
पीडितेला बेशुद्धावस्थेत सोडून काढला पळ: मुख्य आरोपी इम्रानला मदत करणाऱ्या आकाशला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. इम्रानने कथौटा तलावाजवळून 18 वर्षीय विद्यार्थिनीला जबरदस्तीने आपल्या ऑटोमध्ये बसवले आणि पॅलासिओ मॉलच्या मागे असलेल्या झुडपात नेले आणि तेथे तीन तास तिच्यावर बलात्कार केला. बलात्काराची घटना घडल्यानंतर आरोपीने पीडितेला हुसदिया चौकात बेशुद्धावस्थेत सोडून पळ काढला. या घटनेनंतर सक्रिय झालेल्या पोलिसांनी विभूती खांड पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवून कारवाई सुरू केली आणि २४ तासांत आकाशला अटक करण्यात आली.