बाराबंकी (उत्तर प्रदेश) Loco Pilot Stopped Train : उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आलीय. आपली ड्युटी संपल्यानंतर दोन्ही गाड्यांचे लोको पायलट (ड्रायव्हर) रेल्वे स्थानकावर गाडी उभी करुन आराम करायला गेले. यामुळं दोन्ही गाड्या जवळपास चार तास रेल्वे स्थानकावर उभ्या होत्या. यातील एका गाडीच्या चालकाला कसंतरी समजावून गाडी सोडण्यात आली. तर दुसऱ्या गाडीचा चालक पुढील प्रवासासाठी तयार झाला नाही. यामुळं रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी एकच गोंधळ केला. रेल्वे स्थानकावर चार तास दोन गाड्या उभ्या राहिल्यानं इतर प्रवासी गाड्यांवरही याचा परिणाम झाला.
नवी दिल्लीला जात होती ट्रेन : बाराबंकी जिल्ह्यातील बुरवाल रेल्वे स्थानकावरुन सहरसा एक्सप्रेस प्रवाशांना घेऊन नवी दिल्लीला जात होती. सहरसा एक्स्प्रेस बुरवाल स्थानकात पोहोचल्यावर चालक ट्रेनमधून खाली उतरला आणि आराम करायला गेला. बराच वेळ प्रवाशांना ट्रेन का उभी आहे हे समजलं नाही. त्यांनी रेल्वे स्थानकावर जाऊन चौकशी केली असता रेल्वे चालकाची ड्युटी संपल्याचं समजलं. त्यामुळं तो आता पुढं जाणार नाही. यामुळं प्रवाशांनी दुसऱ्या ड्रायव्हरची व्यवस्था करण्यास सांगितलं. मात्र स्टेशन मास्तरांनी याला प्रतिसाद दिला नाही.
लोको पायलट ट्रेन पुढं नेण्यास तयार नव्हता : हा सर्व प्रकार कळताच संतप्त प्रवाशांनी रेल्वे स्थानकावरच गोंधळ घातला. प्रवाशांचा गोंधळ पाहून रेल्वे प्रशासन जागं झालं. त्यांनी ड्रायव्हरला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ट्रेन पुढे नेण्यास तयार नव्हता. ड्रायव्हर म्हणाला की आता आपली ड्युटी संपली आहे. म्हणून, दुसऱ्या ड्रायव्हरची व्यवस्था करा आणि ट्रेन त्याच्या पुढील प्रवासासाठी पाठवा. यावेळी सहरसा एक्स्प्रेसच्या प्रवाशांनी इतर प्रवासी गाड्या थांबवल्या, त्यामुळं इतर अनेक गाड्यांवर परिणाम झाला.
सहरसा-नवी दिल्ली एक्स्प्रेस 4 तासांनी रवाना : आपली ड्युटी संपल्यानं ट्रेन चालक ट्रेन पुढे नेण्यास नकार देत असल्याचं स्टेशन मास्तरांनी सांगितलं. रेल्वे चालकाची ड्युटी संपल्यावर दुसरा चालक गाडी पुढं नेण्यासाठी पाठवायला हवा होता, मात्र रेल्वे विभागाच्या दुर्लक्षामुळं अनेक तास गाडी रेल्वे स्थानकावर उभी राहिली, असं प्रवाशांचं म्हणणं आहे. हे प्रकरण वाढत असल्याचं पाहून, रेल्वे प्रशासनानं महत्प्रयासानं लोको पायलटला बोलावून ट्रेनला पुढील प्रवासासाठी पाठवलं. ही ट्रेन सहरसाहून नवी दिल्लीला जात होती. यातून शेकडो प्रवासी प्रवास करत होते.
लखनऊ-बरौनी एक्स्प्रेस रेल्वे स्थानकावरच उभी : सहरसा-नवी दिल्ली एक्सप्रेस बुरवाल रेल्वे स्थानकावर उभी असताना, लखनऊ-बरौनी एक्सप्रेस (15205) रेल्वे स्थानकावर आली. या गाडीच्या चालकानंही आपली ड्युटी संपल्याचं कारण देत पुढं जाण्यास नकार दिला. ड्युटीचे तास पूर्ण झाल्याचं रेल्वे चालकानं सांगितलं. यामुळं दोन्ही गाड्या या रेल्वे स्थानकावर चार तास उभ्या होत्या. यामुळं प्रवाशांना हकनाक मनस्ताप सहन करावा लागला.
हेही वाचा :
- पुण्याकडं येणाऱ्या भारत गौरव यात्रा रेल्वेतील 40 प्रवाशांना विषबाधा, रेल्वे अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची प्रवाशी संघटनेची मागणी
- Garib Rath Express News : नागपूरहून निघालेली गरिब रथ एक्स्प्रेस पुण्याला पोहोचलीच नाही; प्रवाशाच्या पत्नीचा दावा
- Pink Railway Station: नवीन अमरावती रेल्वे स्टेशन झाले 'पिंक रेल्वे स्टेशन', जाणून घ्या 'ही' संकल्पना