गुवाहाटी : आसामच्या नगांव जिल्ह्यामध्ये सुमारे २० हत्ती एका ठिकाणी मृतावस्थेत आढळून आले. प्राथमिक अंदाजानुसार वीज कोसळल्यामुळे या हत्तींचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांना स्थानिकांनी याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी परिसरात शोधमोहीम राबवली.
मुख्य वन संरक्षक अधिकारी अमित सहाय यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री ही घटना घडली. काठियाटोली रेंजच्या राखीव वनक्षेत्राती एका डोंगरावर हे सर्व हत्ती मृतावस्थेत आढळले होते. गुरुवारी आमचे पथक याठिकाणी पोहोचल्यानंतर आम्हाला दोन मृतदेह मिळाले. त्यानंतर आजूबाजूला शोध घेतल्यानंतर आणखी १४ मृतदेह मिळाले. तर, चार हत्तींचे मृतदेह डोंगराच्या पायथ्याशी आढळून आले.
सध्या या हत्तींच्या मृतदेहांच्या शवविच्छेदनाची तयारी सुरू असून, यानंतरच नेमका कशामुळे यांचा मृत्यू झाला हे स्पष्ट होईल. शुक्रवारी हे शवविच्छेदन पार पडेल, असे सहाय यांनी गुरुवारी सांगितले होते.
हेही वाचा : वाघिणीच्या 'त्या' बछड्यांचा मृत्यू वन विभागाला जागे करणारी घटना - कल्याण कुमार