बंगळुरू - विजयापुरा जिल्ह्यात एक दु:खद घटना घडली. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे गर्भाशयातच बाळाचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करत बाळाचे शरीर काढून आईचा जीव वाचवला आहे. बाळाचा मृत्यू झाल्यानंतर गर्भवती महिलेच्या आईने रुग्णालयातच टाहो फोडला. वेळेवर उपचार मिळला असता, तर आपल्या मुलीचा गर्भपात झाला नसता, असे त्या म्हणाल्या. हे दृश्य पाहून उपस्थितांचे अश्रू अनावर झाले.
जिल्ह्यातील बबलेश्वरमधील रहिवासी असलेल्या हनुमाव्वा कोरावारा यांना प्रसूती वेदना होऊ लागल्या. लागलीच कुटुंबीयांनी त्यांना बाबलेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, प्रसूतीमध्ये जोखीम असल्यामुळे डॉक्टरांनी महिलेला विजयापुरा येथे घेऊन जाण्याचा सल्ला दिला.
कोरावरा यांचे कुटुंबीय त्यांना घेऊन विजापूरातील विविध खासगी रुग्णालयात फिरले. मात्र, रुग्णालयांनी त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला. शेवटी संजीव प्रसूती रुग्णालयात नेण्यात आले. तिथे कोरावराला दाखल करून घेतले. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. डॉक्टरांच्या लक्षात आले की बाळाचा पाय आधीच आईच्या गर्भातून बाहेर आला आहे.
बाळाच्या गळ्याभोवती नाभीसंबधीचा दोरखंड गुंडाळल्यामुळे गर्भाशयात बाळाचा मृत्यू झाला. ऑपरेशनद्वारे मृत बाळाला बाहेर काढत आईचा जीव वाचवला आहे. उपचार योग्य वेळेत मिळाले असते तर बाळ वाचले असते, असे डॉक्टरांनी सांगितले.