नवी दिल्ली - शेतकरी आंदोलनाला (Farmers Protest) मोठे यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज कृषी कायदे (Farm laws rolled back) परत घेत असल्याची मोठी घोषणा केली. आम्ही शेतकऱ्यांना कायदे समजून सांगण्यात कमी पडलो, त्याबद्दल देशाची माफी मागतो, असे मोदी म्हणाले. तसेच शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं आणि घरी परतावं, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना केले. गेल्या 11 महिन्यांपासून शेतकऱ्यांचे केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात (Three Farm Laws) आंदोलन सुरू होते. कृषी कायदे मागे घ्यावे, ही मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. जोपर्यंत कायदे रद्द होत नाहीत. तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली होती.
मी देशवासियांची माफी मागतो. शेतकऱ्यांना कायदे समजून सांगण्यात आमचे प्रयत्न कमी पडले. आज गुरु नानक प्रकाशाचा पवित्र सण आहे. त्यामुळे आज तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संसद या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या अधिवेशनात तीनही कृषी कायदे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करेल, असे मोदी म्हणाले.
पीक विमा योजना अधिक प्रभावी करत शेतकर्यांना तिच्या कक्षेत आणले. शेतकऱ्यांना अधिक नुकसान भरपाई मिळावी म्हणून जुने नियम बदलले. त्यामुळे गेल्या चार वर्षांत शेतकऱ्यांना एक लाख कोटींहून अधिक नुकसान भरपाई मिळाली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी पावले उचलण्यात आली. आम्ही एमएसपी वाढवली तसेच विक्रमी सरकारी केंद्रे निर्माण केली. सरकारने केलेल्या खरेदीने अनेक विक्रम मोडले. आम्ही शेतकर्यांना त्यांचा माल कुठेही विकण्यासाठी व्यासपीठ दिलं, असे मोदी म्हणाले.
आमच्या सरकारने शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे. देशात छोट्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. अनेकांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. या लहान शेतकऱ्यांची संख्या 10 कोटींहून अधिक आहे. तुटपुंज्या जमिनीच्या जोरावर ते स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कुटुंबांची पिढ्यानपिढ्या होणारी विभागणी जमीन आणखी संकुचित करत आहे. म्हणूनच आम्ही बियाणे, विमा, बाजार आणि बचत यावर सर्वांगीण काम केल्याचे मोदींनी सांगितले.