नवी दिल्ली: राष्ट्रीय जनता दल म्हणजे आरजेडीचे आजारी असलेले प्रमुख लालू प्रसाद यादव यांची सिंगापूरस्थित मुलगी वडिलांना किडनी दान करणार आहे अशी माहिती कुटुंबातील एका जवळच्या सदस्याने दिली असल्याचे वृत्तसंस्थेने म्हणले आहे. यादव हे मूत्रपिंडाच्या समस्येवरील उपचारासाठी सिंगापूर गेले होते. गेल्या महिन्यात ते परतले मात्र ते सध्या विविध आजारांनी त्रस्त असुन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना डाॅक्टरांनी किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिलेला होता.
सिंगापूरमध्ये राहणारी त्यांची मुलगी रोशनी आचार्य हिने वडिलांना नवीन जीवन देण्यासाठी पाऊल उचलले आहे. अशी माहिती कुटुंबातील एका जवळच्या सदस्याने पीटीआयला दिली आहे. यादव सध्या दिल्लीत आहेत. चारा घोटाळ्याच्या प्रकरणात गुंतल्यामुळे त्यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. मात्र उपचारासाठी ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. त्यांना दिल्ली आणि रांची येथे अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया कुठे आणि कधी होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.