नवी दिल्ली Lakhbir Singh Landa : बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) नेता आणि गँगस्टर लखबीर सिंग लांडाला भारत सरकारनं दहशतवादी घोषित केलंय. बेकायदेशीर कृती कायद्यांतर्गत हा निर्णय घेण्यात आलाय. मूळचा पंजाबमधील तरन तारण जिल्ह्यातील लखबीर सिंग लांडा सध्या कॅनडातील अल्बर्टा येथील एडमंटन इथं राहतो. तो खलिस्तान समर्थक कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होता. त्यानंतर राष्ट्रीय तपास संस्था एनआयएमध्ये त्याच्याविरुद्ध तपास सुरू करण्यात आला होता.
शस्त्र तस्करीचा मुख्य सुत्रधार : गृह मंत्रालयानं शुक्रवारी यासंदर्भात एक अधिसूचना जारी करुन या निर्णयाची माहिती दिलीय. या अधिसूचनेनुसार, लांडा हा पाकिस्तानमधून भारतात शस्त्रे आणि आयईडी उपकरणांची तस्करी करणारा मुख्य सूत्रधार आहे. एनआयएनं त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल केले आहेत.
पंजाब हल्ल्याचा मास्टरमाईंड : लांडा हा 9 मे 2022 रोजी पंजाब पोलिसांच्या गुप्तचर मुख्यालयावर रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड (RPG) हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. याप्रकरणी पंजाब पोलीस आणि एनआयएनं त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. मात्र, तो कॅनडामध्ये लपून बसल्यानं त्याला अटक करण्यात यश आलेलं नाही.
कॅनडातील खलिस्तान समर्थकांशी संबंधित : लांडा कॅनडातील खलिस्तान समर्थक घटकांशी (पीकेई) संबंधित आहे. पंजाब पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पंजाबमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी लांडा सीमेपलीकडून विविध मॉड्यूल्सना इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस (आयईडी), शस्त्रे, स्फोटके पुरवतो. पंजाबसोबतच तो देशाच्या विविध भागात दहशतवादी माड्युल तयार करत आहे. यात खंडणी, खून, बॉम्बस्फोट, ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांची तस्करी यांचाही समावेश आहे. 2021 मध्ये लांडाच्या विरोधात लूक आउट परिपत्रक जारी करण्यात आलं होतं. एनआयएनं त्याच्यावर बक्षीसही जाहीर केलंय.
10 लाखांचं बक्षीस : सप्टेंबरमध्ये राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) कॅनडास्थित दहशतवादी लखबीर सिंग लांडा आणि पाकिस्तानस्थित हरविंदर सिंग रिंडा यांच्यासह बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) च्या पाच दहशतवाद्यांची माहिती देणार्यास रोख बक्षीस जाहीर केलं होतं. एजन्सीनं लांडा आणि रिंडा यांची माहिती देणाऱ्याला 10 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं.
हेही वाचा :