तिरुवअनंतपुरम : केरळमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. काही दिवसांपूर्वी पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा लतिका सुभाष यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आता केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा के. सी. रोसाकुट्टी यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. महिला कार्यकर्त्यांकडे पक्ष दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तीन दशकांपासून होत्या पक्षात..
रोसाकुट्टी या सुलतान बाथरी मतदारसंघातून आमदार राहिल्या आहेत. तसेच, यापूर्वी त्यांनी केरळ महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची धुराही सांभाळली आहे. गेल्या तीन दशकांपासून त्या काँग्रेसमध्ये होत्या. त्या ऑल इंडिया काँग्रेस कमिटी आणि काँग्रेस पॉलिटिकल अफेअर्स कमिटीच्याही सदस्य राहिल्या आहेत. सध्या पक्षामध्ये होत असलेल्या अंतर्गत राजकारणाबाबत त्या नाराज होत्या.
यापूर्वी लतिका सुभाष यांचा राजीनामा..
१४ मार्चला केरळ महिला काँग्रेसच्या अध्यक्षा लतिका सुभाष यांनी येत्या विधानसभेमध्ये उमेदवारी न दिल्याने केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाबाहेर मुंडन करत आंदोलन केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी लतिका यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनीदेखील पक्षामध्ये महिलांना योग्य ते स्थान दिले जात नसल्याचा आरोप केला होता.
काँग्रेसला गळती..
यासोबतच गेल्या काही दिवसांमध्ये पक्षातून बऱ्याच जणांनी राजीनामे दिले आहेत. यामध्ये केपीसीसीचे सचिव रमानी पी. नायर, तसेच २३ जिल्हा-स्तरावरील नेत्यांचा समावेश आहे. तसेच कन्नुर जिल्ह्यातील सात ब्लॉक अध्यक्षांनीही राजीनामा दिला आहे.
केरळमध्ये विधानसभेच्या १४० जागांसाठी सहा एप्रिलला मतदान पार पडणार आहे. तर, दोन मे रोजी मतमोजणी होणार आहे.