कोलार (कर्नाटक) : सुरत कोर्टाने काल राहुल गांधींना शिक्षा सुनावल्याबद्दल कर्नाटकच्या कोलारमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना कोलारचे भाजप खासदार एस मुनीस्वामी म्हणाले की, 2019 लोकसभा निवडणुकीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यात आल्यावर राहुल गांधी 'मोदी चौकीदार नही चोर है' असे म्हणाले होते. त्यासाठी भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी सुरत जिल्हा न्यायालयात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता. आता न्यायालयाने या प्रकरणी त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या वतीने पूर्णेश मोदींचे अभिनंदन करतो.
'राहुल गांधींची राजकारणात राहण्याची लायकी नाही' : एस मुनीस्वामी पुढे म्हणाले की, 'आज जगाचे नेते असलेले नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कसे बोलावे आणि विरोधी पक्ष म्हणून कसे वागावे याचे भान राहुल गांधींना नाही. परदेशात जाऊन आपल्या देशातील लोकशाही डळमळीत आहे, असे वक्तव्य करणाऱ्यांची राजकारणात राहण्याची लायकी नाही. काँग्रेस पक्षाने राज्यात आणि देशात अधोगतीची पातळी गाठली आहे'.
'राहुल गांधींना दिलेली शिक्षा योग्य' : ते म्हणाले की, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कोलारमधून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र येथील वास्तव पाहिल्यानंतर काँग्रेसमध्ये बुथ स्तरावर नेते नसल्याचे सांगत त्यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आज काँग्रेसमध्ये कोणीही निवडणूक लढवण्यासाठी पुढे येत नाही. काँग्रेस हा भाजपच्या बरोबरीचा पक्ष नाही. भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष असून सर्व जातींच्या लोकांना तो एकत्र आणतो. राज्याचा विकास आणि देशाचा विकास या उद्देशाने लोकांनी भारतीय जनता पक्षाला निवडले असल्याने न्यायालयाने राहुल गांधींना दिलेली शिक्षा योग्य असल्याचे मुनीस्वामी म्हणाले.
डीके शिवकुमार यांची प्रतिक्रिया : न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना केपीसीसीचे अध्यक्ष डीके शिवकुमार म्हणाले की, हे राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे. भारत जोडो यात्रेतून मिळालेला प्रतिसाद पाहून हे पाऊल उचलले गेले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचे नेते हे सर्व पाहत आहेत. राहुल गांधींचे पणजोबा पंडित नेहरू यांनाही 13 वर्षे तुरुंगवास भोगावा लागला होता. त्यांची आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांनी देशाची एकता, अखंडता आणि शांतता यासाठी बलिदान दिले. सोनिया गांधींना पंतप्रधानपद मिळाले असले तरी देशाची अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी त्यांनी त्या पदाचा त्याग केला. राहुल गांधींनी देशासाठी सत्तेचा त्याग केला आहे. लोकांच्या प्रेमासाठी ते काम करत आहेत, असे डीके शिवकुमार म्हणाले.
काय आहे प्रकरण? : 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, राहुल गांधी यांनी कर्नाटकातील कोलार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून वादग्रस्त विधान केले होते. या संदर्भात भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी सुरत जिल्हा न्यायालयात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला आहे. सुरत न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी करताना राहुल गांधींना दोषी घोषित केले. या प्रकरणी आदेश जारी करण्यासाठी न्यायालयाने 23 मार्चची तारीख निश्चित केली होती. त्यानुसार आज जर या प्रकरणातील आरोपींना शिक्षा झाली नाही तर त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाईल त्यामुळे राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. यानंतर त्यांना लगेचच जामीनही मंजूर करण्यात आला आहे.
हेही वाचा : Amritpal Singh: खलिस्तानवादी अमृतपाल सिंग नेपाळला पळून जाण्याची शक्यता, उत्तराखंडमध्ये सुरक्षा वाढवली