तिरुवअनंतपूरम - केरळ राज्यात बर्ड फ्लूचा प्रसार झाला असून शेकडो पक्षांचा मृत्यू झाला आहे. या संकटापासून पोल्ट्री व्यावसायिकांना सावरण्यासाठी केरळ सरकार धावून आले आहे. पोल्ट्री व्यवसायिकांना सरकार नुकसान भरपाई देणार असून राज्याच्या कॅबिनेट बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
प्रसार रोखण्यासाठी पक्षी आणि अंडी नष्ट केली -
बर्ड फ्लूच्या प्रसारामुळे राज्यात ५० हजार कोंबड्या, बदके आणि इतर पोल्ट्री पक्षांना मारण्यात आले आहे. त्याचा या व्यवसायावर परिणाम झाला आहे. या व्यवसायातील शेतकऱ्यांची नाजूक स्थिती पाहता सरकारने त्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.
कॅबिनेट बैठकीत घेतला निर्णय -
२ महिन्यांपेक्षा जास्त वय असणाऱ्या पक्षांना प्रत्येक पक्षामागे २०० रुपये तर २ महिन्यांपेक्षा कमी वय असलेल्या पक्षामागे १०० रुपये मिळणार आहेत. बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने अंडीही मोठ्या प्रमाणात नष्ट केली. त्यामुळे प्रती अंडे ५ रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. पशुसंवर्धन आणि संबंधित विभागांना सतर्क राहण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.