नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत काल (गुरुवार) कोरोनाचे ७ हजार ५३ नवे रुग्ण सापडले तसेच १०४ रुग्णांचा उपचारानंतर मृत्यू झाला. शहरात कोरोनाचा प्रसार वाढत असताना पुढील दहा दिवसांत कोरोनाची स्थिती आटोक्यात येईल, अशी आशा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली आहे. महामारी नियंत्रणात आणण्यासाठी दिल्ली सरकारने विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. केजरीवाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागरिकांशी संवाद साधला. मुख्यमंत्री केजरीवाल उद्या (शनिवार) अक्षरधाम मंदीरात आयोजित करण्यात आलेल्या दीपावली उत्सवात सहभागी होणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत फटाके वाजविण्यावर बंदी घालण्यात आली आहे. हवा प्रदुषणामुळे शहरात कोरोनाचा धोका अधिक वाढला आहे. हिवाळ्यात दिल्लीतील प्रदूषणचा प्रश्न गंभीर होत असतो. त्यावरूनही केजरीवाल यांनी चिंता व्यक्त केली. मागील दहा-बारा वर्षात पिकांच्या काढणीनंतर शेतातील अनावश्यक भाग पेटवून दिल्याने उत्तर भारतात प्रदुषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे, असे ते म्हणाले. हरयाणा आणि पंजाब राज्यात शेतांना मोठ्या प्रमाणात आगी लावल्या जातात. त्यावर त्यांचा बोलण्याचा रोख होता.
केजरीवाल यांनी जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. या दिवाळीला कोरोनाचा विचार करता, वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शेतातील पिकाचा टाकाऊ भाग जाळण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केल्यामुळे त्यांनी पूसा इन्स्टिट्युटचे आभार मानले. या संबंधीचा प्रयोग दिल्लीतही करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.