हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भाजपविरोधी मोहीम सुरू करण्याची घोषणा बुधवारी केली. यासाठी त्यांनी एनडीएमध्ये नसलेल्या सर्व पक्षांची बैठक बोलावली आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात हैदराबादमध्ये ही बैठक होईल.
या नेत्यांना बैठकीचे निमंत्रण
या बैठकीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, जनता दल (सेक्युलर)चे अध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती आणि द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन या सर्वांना या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. देशभरात भाजप विरोधी मोहीमेचा विस्तार कशाप्रकारे करता येईल याच्या आराखड्यावर या बैठकीत चर्चा केली जाईल.
...म्हणून घेणार पुढाकार
भाजपच्या "लोक विरोधी, शेतकरी विरोधी आणि कामगार विरोधी" धोरणांमुळे त्यांच्याविरोधात ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या मोहिमेचा केंद्रबिंदू हैदराबाद असणार आहे, असे केसीआर यांनी स्पष्ट केले. ते तेलंगणा राष्ट्र समितीच्या (टीआरएस) नेत्यांसोबत एका बैठकीत बोलत होते. भाजपविरोधी मोहीम सुरू करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी इतर पक्षांच्या नेत्यांची मागणी होती, असेही त्यांनी या बैठकीत सांगितले.
इतर नेत्यांसोबत याआधीही चर्चा..
यासोबतच, त्यांनी याबाबत ममता बॅनर्जी, केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्याशी अगोदरच याबाबत चर्चा केली आहे. तसेच स्टॅलिन, अखिलेश यादव, मायावती, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल आणि डाव्या पक्षांशीही आपण यासंदर्भात बोललो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे आणि सामान्यांचे नुकसान होत आहे. या लोकांच्या पाठीशी आपण उभे असल्याचे केसीआर यावेळी म्हणाले.
काँग्रेसपासून मात्र दोन हात
इतर प्रादेशिक पक्षांना या बैठकीसाठी आमंत्रित करताना केसीआर यांनी काँग्रेसला मात्र या बैठकीपासून दुर ठेवले आहे. पक्षाच्या कोणत्याही नेत्याला त्यांनी आमंत्रित केलेले नाही. त्यामुळे भाजप बरोबर काँग्रेसपासूनही केसीआर यांनी दोन हात लांब रहाणे पसंत केले आहे. प्रादेशिक पक्षांची मोट बांधून केंद्रातील राजकारणात आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न केसीआर यांचा आहे, असे राजकीय जाणकारांना वाटते.
हेही वाचा : पृथ्वीवरील स्वर्ग असलेल्या काश्मीरमध्ये एक आहे 'मृत्यूची दरी'