बंगळुरू : यादगिरी जिल्ह्यातील अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अपघातात 13 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामध्ये मृत्यू पावलेले प्रवासी हे आंध्र प्रदेशातील नंद्याला जिल्ह्यातील वेलागोडू गावचे रहिवासी होते. ते कलबुर्गी येथे सुरू असलेल्या दर्गाह उरुसच्या कार्यक्रमाला जात होते.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुनीर (40), नयामत उल्लाह (40), मीजा (50), मुदस्सीर (12) आणि सुम्मी (13) अशी अपघातामधील मृतांची नावे आहेत. हे संपूर्ण कुटुंब क्रूझर गाडीतून उरुसच्या कार्यक्रमाला जात होते. क्रुझर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लॉरीला धडकली. ही धडक एवढी भीषण होती की, 18 पैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
नागरिकांनी वेळीच केली मदत: अपघात होताच स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी अपघातस्थळी बचावकार्य सुरू केले. नागरिकांनी वाहनातील जखमींना बाहेर काढण्यात आले. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केले. मृतदेह वाहनातून काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
क्रुझर चालकाची चूक असल्याचा अंदाज: पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार अपघातात क्रुझर चालकाची चूक होती. संपूर्ण तपासानंतरच या घटनेमागची नेमकी कारणे समजू शकणार आहेत. या घटनेबाबत सैदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लॉरी चालकाला झोप लागल्याने त्याने वाहन रस्त्याच्या कडेला घेतले होते. मात्र, याचवेळी क्रुझरचा चालक बाजूला रस्त्यावर उभ्या असलेल्या लॉरीला धडकला.
रस्ते अपघातामधील मृत्यूंचे प्रमाण वाढले- आयशा, अनस, सुहाना, रमीझा, मसी उल्लाह, सीमा, रियाझ उनबी, मुज्जू, नसीमा, माशुम बाशा, मुझाकिर, हनीफा, सोहेल यांच्यासह १३ जण जखमी झाले आहेत. त्यांना रायचूर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रस्ते अपघातात मृत्यूंचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे वाहनावर नियंत्रण, मद्यपान न करता वाहन चालविणे, चालकाने विश्रांती घेऊन चालविणे अशा विविध नियमांचे पालन करावे, अशा सूचना सतत वाहतूक नियंत्रण विभागाकडून देण्यात येतात.
हेही वाचा-