बंगळुरू - कर्नाटकमध्ये आज ग्रामपंचायत निवडणुकांसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. वातावरणात प्रचंड गारवा असूनही ठिक-ठिकाणी मतदारांचा उत्साह पहायला मिळाला. नागरिकांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावर हजेरी लावली.
2 हजार 709 ग्रामपंचायतींसाठी मतदान -
निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील 109 तालुक्यांतील एकून 2 हजार 709 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. 39 हजार 378 जागांसाठी 1 लाख 5 हजार 431 उमेदवार निवडणूक मैदानात आहेत. 20 हजार 728 मतदान केंद्रावर सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
कोरोना बाधितांसाठीही मतदान करण्याची सुविधा -
राज्यातील एकून 3 हजार 697 उमेदवार अगोदरच बिनविरोध निवडून आले आहेत. कोरोना महामारीच्या संकटात ही निवडणूक होत आहे. ज्या नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यांना देखील मतदान करता येणार आहे. मतदानाच्या शेवटच्या एका तासात त्यांना मतदान करता येईल. त्यासाठी खास व्यवस्थाही करण्यात आली आहे.
30 डिसेंबरला होणार मतमोजणी -
ग्राम पंचायत निवडणूक सुरळीत पार पडावे यासाठी ८० हजार पोलिसांची फौज ठिक-ठिकाणी तैनात आहे. याव्यतिरिक्त अंगनवाडी सेविका, आशा सेविका आणि आरोग्य विभागातील कर्मचारी देखील निवडणूक ड्यूटी करत आहेत. 22 डिसेंबरला पहिल्या टप्प्यात 117 तालुक्यांतील 3 हजार 19 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. 30 डिसेंबरला मत मोजणी होणार आहे.