बेंगळुरू: कर्नाटक सरकारने भाजप कार्यकर्ता प्रवीण नेत्तारू खून प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज बेंगळुरू येथे ही माहिती दिली.
मी डीजी, आयजी यांच्याशी चर्चा केली आहे. प्रवीण खून प्रकरण हा संघटित गुन्हा असल्याचा संशय असून, या प्रकरणात आंतरराज्यीय गुन्हेगारांचा सहभाग असल्याचा संशय असल्याने आम्ही हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्याचा निर्णय घेतला- मुख्यमंत्री
प्रवीण हत्या प्रकरणाचा तपास जोरात सुरू आहे. केरळ सीमेवर कडक सुरक्षा तसेच दक्षिण कन्नड जिल्ह्यात रात्रीची गस्त वाढवण्यासह अनेक उपाय सुचवले आहेत. KSRP ची आणखी एक बटालियन दक्षिण कन्नड येथे हलवली जावी, असेही मुख्यमंत्री बोम्मई यांनी सुचवले आहे. जिल्हा भाजप युवा मोर्चा समितीचे सदस्य प्रवीण यांची सुलिया तालुक्यातील बेल्लारे येथील त्यांच्या ब्रॉयलर दुकानासमोर मंगळवारी रात्री मोटार बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी वार करून हत्या केली होती.