बंगळुरू - कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाबच्या वादात दिलासादायक बाब ( Bushra Mateen success story ) आहे. 22 वर्षीय बुशरा मतीन हिने 16 सुवर्ण पदके जिंकणारी ही विश्वेश्वरय्या तंत्रज्ञान विद्यापीठाची पहिली विद्यार्थिनी ( Visvesvaraya Technological University ) ठरली आहे. रायचूरच्या एसएलएन कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधील सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवीधर बुशरा मतीन हिला विद्यापीठाच्या 21 व्या दीक्षांत समारंभात ही पदके मिळाली आहेत.
विद्यार्थिनी बुशरा मतीनने स्थापत्य अभियांत्रिकी शाखेत 9.73 च्या एकूण एकत्रित ग्रेड पॉइंट सरासरीसह (GPA) प्रथम क्रमांक मिळविला आहे. एवढेच नाही तर स्थापत्य अभियांत्रिकी विभागाची विद्यार्थिनी बुशरा मतीन हिने 16 सुवर्णपदके जिंकून नवा विक्रमही केला आहे. बुशरा मतीन ही विद्यापीठाच्या इतिहासातील सर्वाधिक पदके मिळविणारी विजेती ठरली आहे.
राज्यपालांसह लोकसभा अध्यक्षांनी केले अभिनंदन
विद्यापीठातील विद्यार्थ्याने सर्वाधिक 13 सुवर्णपदके मिळविली होती. कर्नाटकचे राज्यपाल थावर चंद गेहलोत यांनी 16 सुवर्णपदके जिंकल्याबद्दल बुशरा मतीनचे अभिनंदन केले आहे. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, उच्च शिक्षण मंत्री अश्वथ नारायण, कुलपती प्रा. करिसिद्दप्पादेखील उपस्थित होते.
नागरी सेवेत रुजू होण्याचे स्वप्न
पदकांव्यतिरिक्त, बुशरा मतीनने एसजी बालकुंदरी सुवर्ण पदक ( Shri SG Balekundri gold medal ) , जेएनयू विद्यापीठ सुवर्ण पदक ( JNU University gold medal ) , व्हीटीयू सुवर्ण पदक ( VTU gold medal ) आणि आर एन शेट्टी ( RN Shetty gold medal ) हे सुवर्ण पदके जिंकली आहेत. तिला दोन रोख पारितोषिकेही मिळाली आहेत. व्यवसायाने स्थापत्य अभियंता असलेले वडील आणि भाऊ यांना पाहून तिला सिव्हिल इंजिनीअरिंगमधील आवड वाढली.
आत्मविश्वास आणि जिद्द ही यशाची गुरुकिल्ली
बुशरा मतीन म्हणाली की, मी वैद्यकशास्त्र शिकावे, अशी वडिलांची इच्छा होती. परंतु त्यांनी माझ्या सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेण्याच्या निर्णयालाही प्रोत्साहन दिले. आता बुशराला यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करायची आहे. काहीही अशक्य नाही, असे तिला वाटते. आत्मविश्वास आणि जिद्द ही यशाची गुरुकिल्ली आहे, यावर तिचा विश्वास आहे. दरम्यान, 16 सुवर्णपदके जिंकल्याबद्दल सोशल मीडियावर लोक बुशराचे कौतुक करत आहेत.