नवी दिल्ली - केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन उभारले असून दिल्लीला घेराव घातला आहे. आज शेतकरी नेत्यांमध्ये आणि सरकारमध्ये चर्चा सुरू असून अद्यापही तोडगा निघालेला नाही. अनेकांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तर काहींनी कायद्याचे समर्थन केले आहे. दरम्यान, शेतकरी आंदोलनावरून बॉलिवूड अभिनेत्री कंनगा रणौत आणि पंजाबी अभिनेता, गायक दिलजीत सिंग दोसांज यांच्यात ट्विटरवर चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळाले.
कंगनाच्या वक्तव्यावर भडकला दिलजीत दोसांज
शेतकरी आंदोलनात १०० रुपये देऊन एक वृद्ध महिला सहभागी झाल्याचे वक्तव्य कंगना रणौतने केले होते. तसेच दिलजीत दोसांजला कंगनाने एका ट्विटमध्ये करण जोहरचा 'पालतू' (पाळीव) असल्याचे म्हटले होते. तिच्या या वक्तव्यावर दिलजीतने संताप व्यक्त करत ट्विटरवर कंगनाला चांगलेच फटकारले आहे. या वृद्ध महिलेचा जबाब दिलजीतने ट्विटवर शेअर करत कंगनाला उत्तर दिले. मात्र, त्यानंतर दोन्ही कलाकारांत चांगलीत जुंपली. खालच्या दर्जाची भाषा दोघांनीही वापरल्याने त्यांचे लाखो चाहते अवाक् झाले. कंगना रणौत शेतकरी कायद्यांच्या समर्थनार्थ बोलत असून दिलजीतने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
काय म्हणाला दिलजीत सिंग दोसांज
एखाद्या व्यक्तीने एवढं आंधळ असू नये. कंगनाने आत्तापर्यंत ज्या लोकांसोबत काम केले आहे. त्यांची पण तू पालतू आहेस का? हा बॉलिवूड नसून पंजाबी लोकांचा मुद्दा आहे. खोटे बोलून आणि लोकांच्या भावना भडकावण्याचं काम तू चांगलं करतेस, असे ट्विट दिलजीत सिंग दोसांज याने केले. याला पुन्हा कंगनाने उत्तर दिले. यानंतर दोघांमध्ये ट्विटरवर चांगलीच जुंपली.