रायपूर - राष्ट्रपिता महात्मा गांधीजींवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजांच्या अडचणींत ( Troubles of Sant Kalicharan ) वाढ होताना दिसून येत आहे. महाराष्ट्रातील एका महिलेने कालीचरण महाराजांवर 25 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. यासोबतच महिलेने कालीचरण महाराजांवर आणखीही अनेक गंभीर आरोप केले आहेत. महिलेने पत्र लिहून रायपूर पोलिसांकडे कारवाई करण्याची तसेच आपले 25 हजार रुपये परत करण्याची मागणी केली आहे. रायपूर एसएसपीला लिहिलेल्या पत्रात महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनाही मदत करण्याचे आवाहन केले आहे.
समस्या सोडवण्याच्या नावाखाली संत कालीचरण यांनी आपली फसवणूक केल्याचा आरोप महिलेने केला आहे. कालीचरण महाराज यांना फोनवरून पाच हजार रुपये ट्रान्सफर केल्याचे महिलेने सांगितले. त्यानंतर आपण कालीचरण यांच्याशी फोनवर बोलत होतो आणि आपल्या समस्या सांगत होतो. तेव्हा समस्या सोडवण्यासाठी कालीचरण महाराजांनी आपल्याकडे वारंवार पैशांची मागणी केली होती. त्यावर आपण एकूण 25 हजार रुपये त्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले होते. पण, पैसे मिळाल्यानंतरही कालीचरण महाराजांनी काम केले नाही, असा आरोप महिलेने केला आहे.
तसेच कालीचरण महाराजांचे एका महिलेसोबत अवैध संबंध असल्याचा आरोपदेखील महिलेने केला आहे. मी कालीचरण यांना देवाप्रमाणे मानत होते. पण सत्य समोर आल्यानंतर मला खूप वाईट वाटलं, असे महिलेने पत्रात म्हटलं. या प्रकरणी रायपूरच्या एसएसपींनी टिकरापारा पोलीस ठाण्यात तक्रार केली असून तपासासाठी निर्देश दिले आहेत. पीडित महिलेच्या तक्रारीची चौकशी केल्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. सध्या कालीचरण महाराज हे रायपूर सेंट्रल जेलमध्ये बंद आहेत.
हेही वाचा - Kalicharan Maharaj : कालीचरण महाराजांना वर्धा पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता