नवी दिल्ली: न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांची सोमवारी भारताचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली, असे केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले. न्यायमूर्ती चंद्रचूड यांना 9 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ देतील. ते न्यायमूर्ती यूयू ललित यांच्या जागी असतील, जे फक्त 74 दिवसांचा अल्प कालावधी सेवा देत आहेत.
याबाबत माहिती देताना केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्वीट करत सांगितले आहे की, "भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करून, राष्ट्रपतींनी डॉ. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांची 9 नोव्हेंबर 2022 पासून भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे." किरेन रिजिजू यांनी न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांना 9 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या औपचारिक शपथविधीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
मे 2016 मध्ये न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड (Justice DY Chandrachud) यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांचे वडील वायव्ही चंद्रचूड हेही देशाचे सरन्यायाधीश राहिले आहेत. सर्वाधिक काळ CJI राहण्याचा विक्रमही वायव्ही चंद्रचूड यांच्या नावावर आहे. 1978 ते 1985 या काळात ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.
न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1959 रोजी झाला. चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून एलएलबी केले आहे. 1998 मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून नामांकन मिळाले. ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशही राहिले आहेत. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड हे शबरीमाला, समलैंगिकता, आधार आणि अयोध्या प्रकरणांसह अनेक मोठ्या खटल्यांमध्ये न्यायाधीश राहिले आहेत.