नवी दिल्ली - स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा 3 जानेवारी हा जन्मदिवस राज्यात साजरा करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांच्या 190 व्या जयंतीनिमित्त जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) विद्यार्थ्यांनी एकत्र येत उत्तर प्रदेशात लागू करण्यात आलेल्या लव्ह जिहाद कायद्याच्या विरोधात आवाज उठवला. विद्यार्थ्यांनी लव्ह जिहादविरोधात लव्ह आझाद अभियान चालवले.
प्रत्येकाला प्रेम करण्याचा अधिकार -
विद्यार्थ्यांच्या वतीने लव्ह आझाद नावाची मोहीम आयोजित करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी या मोहिमेला आपले समर्थन दिले. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. प्रत्येकावर प्रेम करण्याचा अधिकार आहे. मात्र, लव्ह जिहादचा कायदा तरुण मुस्लिम पुरुष आणि समाजातील सर्व महिलांच्या हक्कांचे उल्लंघन आहे, असे विद्यार्थ्यांनी म्हटलं. लव्ह जिहाद तरुणांवर होणाऱ्या हिंसाचार आणि अत्याचाराला प्रोत्साहन देईल, असेही म्हटलं.
सावित्रीबाई आणि फातिमा शेख यांची मैत्री -
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना सावित्रीबाई आणि फातिमा शेख यांची मैत्रीला उजाळा दिला. दोघींची मैत्री निर्भय, बेपर्वा, बिनशर्त स्वातंत्र्याचे प्रतिक आहे. देशातील सर्व तरुणांना सावित्रीबाई आणि फातिमा यांचा आदर्श आहे. लॉ ऑफ जिहाद हे संघ परिवार आणि भाजप सरकारचे जातीयवादी आणि फासीवादी धोरण आहे, असेही विद्यार्थ्यांनी म्हटलं.
लव्ह जिहाद?
मागील काही दिवसांपासून लव्ह जिहाद विरोधात देशातील वातवरण चांगलेच तापत असल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करण्यात आला आहे. लव्ह-जिहाद कायद्याबाबत पहिली भूमिका घेणारे राज्य उत्तरप्रदेश ठरलं. भाजपशासीत राज्यात लव्ह जिहादविरोधात कायदा लागू करण्याबाबत पुढाकार घेण्यात आला आहे. मुसलमान मुलांनी बिगरमुस्लिम मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे धर्मांतर करणे म्हणजे 'लव्ह जिहाद, असं म्हटलं जातं.