सीटल - जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपनीत मोठा फेरबदल होणार आहे. अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस सोमवारी राजीनामा देणार आहेत. त्यांच्या जागी अॅमेझॉन वेब सर्व्हिसेसचे सीईओ अँन्डी जस्सी हे अॅमेझॉनच्या मुख्य कार्यकारी पदाचा भार स्वीकारतील.
मुख्य कार्यकारी अधिकारी पद सोडल्यानंतर बेझोस अॅमेझॉनचे कार्यकारी अध्यक्ष राहतील. जेफ बेझोस आपली नवीन कारकीर्द सुरू करणार आहेत. बेझोस आता त्यांच्या इतर प्रकल्पांमध्ये अधिक वेळ घालवतील. ज्यामध्ये त्यांची अंतराळ संशोधन कंपनी ब्लू ओरिजिन मुख्य स्थानी आहे.
अँन्डी जस्सी हे सध्या वेस सर्व्हिसेसचे प्रमुख आहेत. मात्र, त्यांना बढती मिळून ते मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार हाती घेतील. 2020 या आर्थिक वर्षाचा आर्थिक ताळेबंद जाहीर करताना बेझोस यांनी ही घोषणा केली होती. जेफ बेझोस यांनी अॅमेझॉनची स्थापना 27 वर्षापूर्वी केली आहे. बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत आहेत.
अॅमेझॉनकडून अक्षय्य उर्जेची खरेदी -
अॅमेझॉनने २६ पवनचक्क्या आणि काही सौर प्रकल्पांची खरेदी केली आहे. त्यामुळे अॅमेझॉन ही अक्षय्य उर्जेची खरेदी करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. कंपनीला लागणाऱ्या गरजेची पूर्तता ही अक्षय्य उर्जेच्या प्रकल्पामधून पूर्ण करण्याचा अॅमेझॉनचा प्रयत्न आहे.