नवी दिल्ली : देशातील कोरोनाची दुसरी लाट पाहता अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईई-मेन्स पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २७ ते ३० एप्रिलदरम्यान ही परीक्षा पार पडणार होती. मात्र, आता पुढील सूचना मिळेपर्यंत ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली.
देशातील कोरोना परिस्थिती माहता मी एनटीएला (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) एप्रिलमधील जेईई मेन्स परीक्षा पुढे ढकलण्याचे सुचवले आहे. सध्या विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि त्यांचे करिअर यालाच आम्ही प्राधान्य देत आहोत, अशी माहिती पोखरियाल यांनी ट्विट करत दिली होती.
यानंतर एनटीएने ही परीक्षा पुढे ढकलल्याचे स्पष्ट केले. परीक्षांच्या नव्या तारखा या नंतर कळवल्या जातील. परीक्षांच्या तारखांच्या किमान १५ दिवस आधी याबाबत माहिती देण्यात येईल, असे एनटीएने स्पष्ट केले.
हेही वाचा : कुंभमेळ्यातून आलेल्यांना १४ दिवस सक्तीचे गृह विलगीकरण; दिल्ली सरकारचा निर्णय