नवी दिल्ली - महाराष्ट्रात आभाळ फाटल्यागत पाऊस सुरू असून महापूर-भूस्खलनामुळे हाहाकार माजला आहे. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले असून संपर्क तुटला आहे. आशा परिस्थिती येत्या 25 आणि 27 जुलैला होणारी जेईई परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यात येणार आहे.
जेईई मुख्य परीक्षा 2021 (सत्र 3) परीक्षा 25 आणि 27 जुलैदरम्यान आहे. या परीक्षेला पोहोचू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांनी चिंता करू नये, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे. महापूरामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना फटका बसला आहे. या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी धर्मेंद्र प्रधान यांनी हा निर्णय घेतला. जेईई मुख्य परीक्षा 2021 तिसऱ्या सत्राची परीक्षा 20 जुलैपासून सुरु झाली आहे.
महाराष्ट्रात जेईई मुख्य परीक्षा 25 आणि 27 जुलैदरम्यान आहे. कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यी 25 आणि 27 जुलैला आपल्या परीक्षा केंद्रावर पोहचण्यास असमर्थ राहिले. तर त्यांना आणखी एक संधी देण्यात येईल. तारखांची घोषणा लवकरच करण्यात येईल.
सध्या देशात कोरोनाचा कहर आहे. ही परिस्थिती विचारात घेता, यंदा जेईई मुख्य 2021 परीक्षा ही 4 सत्रामध्ये घेण्यात येत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या सत्राची परीक्षा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये झाली. तर तिसऱ्या सत्राची परीक्षा 20 ,22, 25 आणि 27 जुलै या तारखेदरम्यान नियोजित करण्यात आली. तिसऱ्या सत्राच्या परीक्षेला कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थी पूरामुळे उपस्थित राहू शकत नसतील, तर त्यांना चिंता करू नये. त्यांच्यासाठी आणखी एक संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.