नवी दिल्ली - केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेची तारीख 3 जुलै 2021 जाहीर केली होती. मात्र, कोरोनामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
आता पुढील आदेश येईपर्यंत परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोना विषाणूमुळे उद्भवणारी परिस्थिती सामान्य झाल्यानंतर जेईई अॅडव्हान्स परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली जाईल, असे आयआयटी खरगपूरने म्हटलं.
जेईई मेन परीक्षा उत्तीर्ण झालेले अडीच लाख उमेदवार जेईई अॅडव्हान्स परीक्षा देणार आहेत. जेईई अॅडव्हान्स परीक्षेत दोन पेपर असतात. 3 जुलै रोजी जेईई अॅडव्हान्सचा पहिला पेपर सकाळी 9 ते 12 या वेळेत आणि दुसरा पेपर दुपारी अडीच ते सायंकाळी 5.30 या वेळेत होणार होता, मात्र आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. जेईई अॅडव्हान्स परीक्षा आयआयटीसह विविध केंद्रीय संस्थांतील प्रवेशासाठी घेण्यात येते. आयआयटी खडगपूरने या परीक्षेसाठी मॉक टेस्ट जाहीर केल्या होत्या. याशिवाय विषयवार अभ्यासक्रमही jeeadv.ac.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे.