मुंबई - अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर संपूर्ण जगाचं लक्ष तिथल्या घडामोडींवर लागून आहे. अफगाणिस्तान शेजारी राष्ट्र असल्याने भारताची चिंता देखील वाढली आहे. तालिबान दहशतवादाला खतपाणी देत असल्याचा पूर्व इतिहास असल्याने भारताची प्रत्येक घडामोडींवर नजर आहे. प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांनी तालिबानवर परखड मत मांडले. तालिबानी रानटी आणि मध्ययुगीन मानसिकता असलेली लोक आहेत, असे ते म्हणाले. तसेच अख्तर यांनी तालिबानची तुलना राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत केली आहे. तालिबानचा जो उद्देश आहे. तोच आरएसएस, वीएचपी आणि बजरंग दलासारख्या संघटनांचा आहे. भारतीय संविधान त्यांच्या मार्गात अढथळा निर्माण करत आहे. मात्र, संधी भेटली तर ती सीमाही हे पार करतील, असे जावेद अख्तर यांनी म्हटलं.
उजवी विचारसरणीचे (Right Wing) उदाहरण देताना अख्तर म्हणाले, की जगभरातील मुस्लिम राईट विंग, ख्रिश्चन राईट विंग आणि हिंदू राईट विंग यांच्या विचारसरणीमध्ये समानता आहे. तालिबान आणि कट्टरवारी हिंदू यांची ध्येय एकच आहे. ते इस्लामिक देश निर्माण करत आहे. तर हे हिंदू देश निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. फक्त अद्याप हे तालिबान एवढे ताकदवान झाले नाहीत.
राईट विंगकडे वस्तुनिष्ठपणे पाहिले तर त्यांची वेगवेगळी नावे असू शकतात. परंतु ती सर्व समान आहेत. त्यांचे तालिबान सारखेच अल्पसंख्यांकांवर प्रेम नाही. त्यांना महिलांनी घरीच राहावे, असे वाटते. दोघांमध्ये काहीच फरक नाही. दोघेही म्हणतात की कोणताही कायदा त्यांच्या धार्मिक श्रद्धेपेक्षा मोठा नाही, असे जावेद अख्तर म्हणाले.
तालिबानची मध्ययुगीन मानसिकता -
आरएसएस, विहिंप, बजरंग दल सारख्या संघटनांना समर्थन देणाऱ्या लोकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. अर्थातच तालिबानची मध्ययुगीन मानसिकता आहे, यात शंका नाही, ते रानटी आहेत, असे जावेद अख्तर म्हणाले. तसेच मुस्लिम व्यक्तींनी तालिबानला पाठिंबा दिला आहे. यावर जावेद यांनी प्रतिक्रिया दिली. तालिबानला पाठिंबा देणारे मुस्लिम मोजकेच आहेत. मोजक्या मुस्लिमांच्या अशा वक्तव्यांमुळे बहुतांश भारतीय मुस्लिम हैराण असल्याचं त्यांनी म्हटलं.
भारत धर्मनिरपेक्ष देश -
हा देश मुळात धर्मनिरपेक्ष देश आहे. येथील बहुसंख्य लोकसंख्या धर्मनिरपेक्ष आहे. त्यामुळे तालिबानची संकल्पना कोणत्याही भारतीयांना आकर्षित करू शकत नाही. या देशातील बहुतेक लोक सुसंस्कृत आणि सहिष्णु आहेत. त्याचा आदर केला पाहिजे. भारत कधीही तालिबानी देश होऊ शकत नाही, असा विश्वास जावेद अख्तर यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - नसरुद्दीन शाहांचे खडेबोल, तालिबान समर्थकांना चपराक, सोशल मीडियावर पोस्ट केला VIDEO