वाराणसी Janta Raja Mahanatya : धार्मिक नगरी काशी ही छत्रपती शिवरायांच्या जीवनप्रवासाची साक्षीदार बनलीय. मंगळवारपासून काशीमध्ये 'जाणता राजा' महानाट्य सुरु झालंय. छत्रपती शिवरायांच्या जीवनगाथा आणि हिंदवी स्वराज्याच्या घोषणेने पहिल्या पर्वाची सुरुवात झाली. या महानाट्यानं उपस्थितांच्या अंगी रोमांच चेतवले. जिवंत हत्ती, घोडे आणि उंटांनी या नाटकाची सजीवता अधिकच गडद केली. उपस्थितांना अक्षरशः सोळाव्या शतकाच्या कालखंडात गेल्याची अनुभूती झाली. तब्बल 350 वर्षांनंतर काशीनगरीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पाहिला.
नाटकामुळं परिसर चैतन्यमय : बीएचयूच्या एमपी थिएटर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘जाणता राजा’ हे नाटक सुरु आहे. काल या नाटकाचा पहिला दिवस होता. नाटकात छत्रपतींच्या जन्मापासून ते त्यांच्या राज्याभिषेकापर्यंतचे प्रसंग मांडण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमादरम्यान हिंदवी स्वराज्याच्या घोषणेनं सर्वांना इतिहासाच्या सुवर्णकाळात नेलं. 'जय भवानी, हर हर महादेव, जय शिवाजी'च्या घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला.
पहिल्या दिवशी काय घडलं : नाटकाच्या पहिल्या दिवसाबद्दल सांगायचं तर, 3 तास चाललेल्या या नाटकाच्या प्रत्येक क्षणी प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. पहिल्या दिवशी नाटकाची सुरुवात महाराष्ट्रावरील गनिमांच्या हल्ल्यानं होते. सामान्य जनतेवर अत्याचार सुरु असतात. अशा परिस्थितीत शिवरायांचा जन्म होतो आणि त्यांच्या शिक्षणापासून ते योद्धा बनण्यापर्यंतची कथा चित्रित करण्यात आलीय. मोठे झाल्यावर, शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची कमान घेतली आणि कोकणासह 84 बंदरे जिंकली. कथेच्या मध्यांतरानंतर, ते शाइस्ताखानच्या 1.25 लाख सैनिकांच्या सैन्याचा पराभव करतो आणि त्यानंतर त्यांचा राज्याभिषेक होतो. राज्याभिषेकादरम्यान नेत्रदीपक फटाके आणि नृत्य संगीतानं सर्वांना स्तंभित केलं. यावेळी काशीत जणू 'शिवकाळ' पुन्हा अवतरला. पहिल्या दिवशी सुमारे 10,000 लोकांनी हे महानाट्य पाहिलं.
महानाट्याची सुरुवात तीन दशकांपूर्वी : या महानाट्यात हत्ती, घोडे आणि उंट यांचा रंगमंचावर वावर असतो. ज्यामुळं ही शिवगाथा आणखी जिवंत वाटते. तसंच 300 कलाकारांचा त्यात समावेश आहे. ज्यात महाराष्ट्रातील 80 कलाकार आले असून सुमारे 200 कलाकार स्थानिक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी स्थापन केलेल्या महाराज शिवछत्रपती प्रतिष्ठान ट्रस्ट, पुणे या संस्थेनं तीन दशकांपूर्वी हे महानाट्य सुरु केलं होतं. हे प्रथम मराठीत सादर करण्यात आलं. त्यानंतर त्याचं हिंदीत रुपांतर करण्यात आलं. आतापर्यंत अमेरिका आणि इंग्लंडसह अनेक देशांमध्ये त्याचे 1100 हून अधिक प्रयोग झाले आहेत.
हेही वाचा :