श्रीनगर - काश्मीर खोरे आणि जम्मू विभागादरम्यान धावणारी रेल्वे सेवा सोमवारपासून सुरु झाली आहे. ही रेल्वे कोरोना महामारीमुळे गेल्या 11 महिन्यांपासून बंद होती. बारामुल्ला आणि बिनिहाल दरम्यान धावणाऱ्या रेल्वे सेवा सुरळीत करण्यात आल्या आहेत. रेल्वे पुन्हा सुरु झाल्याने प्रवासी आनंदी आहेत. जम्मू विभागातील बनिहाल ते काश्मीरच्या बारामुल्ला रेल्वे लाईनमध्ये 17 रेल्वे स्थानके आहेत.
येत्या 24 फेब्रुवारीपासून राज्यातील खासगी बस चालक अनिश्चितकाळासाठी संपावर जाणार आहेत. प्रदेशात 27 फेब्रुवारीला जेकेएसएसबी चतुर्थ श्रेणीच्या पदभरतीसाठी उमेदवारांची लिखित परीक्षा होणार आहे. तसेच जम्मूमध्ये लष्कर भरतीही सुरू आहे. अशात बस चालकांच्या संपामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
वर्ष 2019 मध्ये काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द झाल्यानंतर परिस्थिती बिकट झाली होती. त्यानंतर कोरोना महामारीमुळे आणखी भर पडली. आता राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. कोरोना काळातच जम्मू-काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. तसेच केंद्राने 4-जी सेवा पूर्ववत केली आहे. तर जम्मू आणि काश्मीर पुनर्गठन (सुधारणा) विधेयक लागू होणार आहे.