नवी दिल्ली : सुकेश चंद्रशेखर यांच्या 200 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात पटियाला हाऊस कोर्टाने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिला ( Actress Jacqueline Fernandez ) तूर्तास दिलासा दिला आहे. न्यायालयाने जॅकलिनला 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला आहे. सोमवारी जॅकलिन कोर्टात हजर राहण्यासाठी पटियाला हाऊसमध्ये पोहोचली.
जॅकलिनच्या वकिलाने सांगितले की, ती सतत तपासात सहकार्य करत आहे. तपास यंत्रणेने तिला जितक्या वेळा चौकशीसाठी बोलावले तितक्या वेळा तिने सहकार्य केले. तपास यंत्रणांनी तिला अनेकवेळा दिल्लीत चौकशीसाठी बोलावले आहे. अशा स्थितीत न्यायालयाने सूचनांसह जॅकलिनला अंतरिम जामीन मंजूर केला आहे. तिला तपास यंत्रणेकडून चौकशीसाठी बोलावले जाईल तेव्हा हजर राहण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
नियमित जामीन याचिकेवर न्यायालयाने ईडीकडून प्रतिसाद मागितला : आरोपपत्रात नाव समाविष्ट केल्यानंतर, जॅकलीन 26 सप्टेंबर रोजी पटियाला हाऊस न्यायालयात हजर झाली, जिथे जॅकलिनच्या वकिलांनी नियमित जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर न्यायालयाने ईडीला उत्तर दाखल करण्यासाठी २२ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे. तोपर्यंत जॅकलिन फर्नांडिसला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.