पणजी (गोवा) - मागच्या वर्षी याच काळात आपण काय भोगले हे सर्वांनाच माहीत आहे. यावर्षी फरक आहे, तो म्हणजे लस उपलब्ध आहे. लस उपलब्ध असूनही न घेणे हे चुकीचे ठरेल. त्यामुळे सरकारने आयोजित केलेल्या लसीकरण मोहिमेत सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन गोवा फॉरवर्ड पक्षाध्यक्ष तथा फातोर्डा आमदार विजय सरदेसाई यांनी केले आहे.
लसीकरण का आवश्यक आहे आणि लोक त्यामध्ये कशाप्रकारे सहभागी होऊ शकतात अथवा ज्यांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहचणे शक्य नाही. अशा नागरिकांच्या मदतीसाठी गोवा फॉरवर्ड काय उपाययोजना करू इच्छितो याची माहिती देण्यासाठी मडगाव येथील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मडगावच्या अध्यक्ष डॉ. बबिता प्रभुदेसाई आणि डॉ. मिलिंद देसाई उपस्थित होते.
सरदेसाई म्हणाले, महामारीच्या या काळात लस टोचून घेणे हे नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे. मागच्या वर्षी आपण जे सोसले तेव्हा आणि आता एक फरक आहे तो म्हणजे लस उपलब्ध आहे. सरकारने सर्वत्र उपलब्ध करून दिली आहे. अशावेळी लस न घेणे हे चुकीचे ठरेल. गोव्यात योग्य प्रमाणात लस उपलब्ध आहे.
डॉ. प्रभूदेसाई म्हणाल्या, कोविशिल्ड या लसीमुळे युरोपमध्ये 60 टक्क्यांहून अधिक कोविड संक्रमण रोखता येणे शक्य झाले आहे. ही लस आपल्या देशात तयार झाली आहे. सरकारने ती मोफत उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता 45 वर्षांवरील नागरिकांनी लसिकरणासाठी पुढे यावे. काही शंका असल्यास डॉक्टरांशी चर्चा करावी. तर डॉ. देसाई म्हणाले, जरी रस घेतली असली तरी सॅनिटायझर, मास्क आणि शारीरिक अंतर (एस-एम-एस ) हे सूत्र पाळले पाहिजे.
दरम्यान, केंद्र सरकारने जाहीर केलेला टीका उत्सव गोव्यातही 11 ते 14 एप्रिल दरम्यान होणार आहे. यामध्ये लोकांनी अधिकाधीक प्रमाणात सहभागी होत लस घ्यावी. यासाठी त्यांच्यात जागृती घडवून आणण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकीय पुढाऱ्यांनी सहभा घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले होते.
हेही वाचा - गोव्यात एप्रिल अखेरपर्यंत राबविणार 'टीका उत्सव' - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत