तिरुअनंतपुरम (केरळ) : इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी चंद्रयान ३ मोहिमेबद्दल नवे अपडेट दिले आहेत. या मोहिमेतून भारत विज्ञानात चांगली प्रगती करेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. आगामी १३ ते १४ दिवस हे चंद्रयान मोहिमेसाठी महत्त्वाचे असणार असल्याचेही इस्रोच्या प्रमुखांनी सांगितले. ते माध्यमांशी बोलत होते.
आता आणखी आंतरग्रहीय मोहिमा सुरू करण्यास सक्षम : 'चंद्रयान ३ मोहिमेद्वारे पुढील दोन आठवडे भरपूर डेटा गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इस्रो शास्त्रज्ञांची टीम या येत्या १३-१४ दिवसांसाठी खूप उत्सुक आहे. आम्हाला आशा आहे की, असे करत असताना आम्ही विज्ञानात खरोखरच चांगली प्रगती करू. भारत अधिक आंतरग्रहीय मोहिमा सुरू करण्यास सक्षम आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) भारताच्या अंतराळ क्षेत्राचा अधिक विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घकालीन दृष्टीकोनाची अंमलबजावणी करण्यास तयार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली इस्रो प्रमुखांची भेट : शनिवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रो प्रमुख एस सोमनाथ आणि चंद्रयान ३ च्या टीमची भेट घेण्यासाठी बंगळुरुला गेले होते. ते दक्षिण आफ्रिका आणि ग्रीसचा विदेश दौरा संपवून थेट तेथे गेले. या दरम्यान त्यांनी इस्रो शास्त्रज्ञांशी संवाद साधला. भारताला चंद्रावर नेण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांसाठी शास्त्रज्ञांचे कौतुक केले.
२ सप्टेंबरला सोलर मिशन लॉन्च करणार : पंतप्रधानांच्या भेटीनंतर इस्रो अध्यक्ष म्हणाले की, केवळ चंद्रावर सॉफ्ट लँडिंग नाही, तर संपूर्ण चंद्रयान ३ मोहीम पूर्णपणे यशस्वी झाली आहे. संपूर्ण देश शास्त्रज्ञांच्या पाठीशी उभा आहे. या मोहिमेनंतर भारत आता अधिक आत्मविश्वासाने चंद्र, मंगळ किंवा शुक्रावर आणखी मोहिमा करण्यास सक्षम आहे, असे ते म्हणाले. तसेच सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल १ सौर मोहिमेचा एक उपग्रह आधीच श्रीहरिकोटा येथे पोहोचला आहे, असे त्यांनी सांगितले. इस्रो येत्या २ सप्टेंबरला सूर्यावरचे आदित्य एल १ सोलर मिशन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
हेही वाचा :
- Aditya L १ Mission : चंद्रानंतर इस्रोची सूर्याकडे झेप; 'आदित्य L1' मिशन 'या' तारखेला होणार लाँच
- Narendra Modi : नरेंद्र मोदींनी घेतली इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांची भेट, चंद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगबद्दल अभिनंदन केलं
- Narendra Modi ISRO : चंद्रयान 3 ज्या ठिकाणी उतरलं ती जागा 'या' नावानं ओळखली जाईल, पंतप्रधान मोदींची घोषणा