जेरुसलेम Israel Hamas War : शनिवारी (७ ऑक्टोबर) हमास या दहशतवादी संघटनेनं इस्रायलवर अचानक हल्ला केला. या हल्यात आतापर्यंत ७०० लोकांचा मृत्यू झाला असून २१०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
हमासच्या हल्ल्यात भारतीय महिला जखमी : इस्रायलमध्ये अनेक भारतीय राहतात. शनिवारी हमासनं डागलेल्या रॉकेटमध्ये एक भारतीय महिला जखमी झाली आहे. ही महिला इस्रायलच्या अश्कलॉन शहरात नर्स म्हणून काम करते. सूत्रांनी सोमवारी ही माहिती दिली. शीजा आनंद असं या महिलेचं नाव असून ती केरळची रहिवासी आहे. शनिवारी झालेल्या हल्ल्यात तिच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली. त्यानंतर तिच्यावर तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दूतावास कुटुंबीयांच्या संपर्कात : त्यानंतर त्या रुग्णालयातून महिलेला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. भारतीय दूतावासानं मदतीसाठी तिच्याशी संपर्क साधला असून दूतावास केरळच्या कन्नूर जिल्ह्यात राहणाऱ्या तिच्या कुटुंबाच्याही संपर्कात आहे. 'तिच्या कुटुंबाला माहिती देण्यात आली आहे. आम्ही शीजा आणि तिच्या कुटुंबाच्या सतत संपर्कात आहोत', असं दूतावासातील एका सूत्रानं सांगितलं. तसेच सध्या चिंतेचं कारण नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
इस्रायलवर ५० वर्षातील सर्वात मोठा हल्ला : गाझा पट्टीतील दहशतवादी संघटना हमासनं शनिवारी सकाळी इस्रायलवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात इस्रायलमध्ये सैनिकांसह किमान ७०० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या हल्ल्यात आतापर्यंत २१०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. गेल्या ५० वर्षांत इस्रायलवर झालेला हा सर्वात प्राणघातक हल्ला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गाझा पट्टीमध्ये इस्रायलनं प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यांमध्ये सुमारे ५०० लोकांचा मृत्यू झाला असून, दोन हजारांहून अधिक जखमी झाले आहेत.
हेही वाचा :
- Israel Hamas Conflict : इस्रायली गुप्तचर यंत्रणेच्या अपयशामुळे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या नेतृत्वाला धोका?
- Israel Hamas Conflict : हमासचा अचानक हल्ला इस्रायली गुप्तचर यंत्रणेचं अपयश, कसा झाला ५० वर्षांतील सर्वात मोठा हल्ला?
- Israel Palestine War : इस्रायल-गाझा दरम्यानच्या मोठ्या सैनिकी कारवाया, जाणून घ्या सविस्तर