श्रीनगर - गेल्या वर्षी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत झालेल्या 'हाय वोल्टेज ड्रामा' नंतर त्याचा दुसरा अंक आता पुन्हा पाहायला मिळत आहे. काँग्रेसमध्ये पुन्हा बंडखोरी होण्याची शक्यता आहे. तथापि, यावेळी रणांगण दिल्लीचे नसून जम्मूचे असेल. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोनिया गांधींना पत्र लिहिलेले 23 नेते पुन्हा एकदा जम्मूत एकत्र जमले आहेत. वास्तविक, जम्मू हे आझाद यांचे कार्यस्थळ राहिले आहे आणि पक्षातील बंडखोरीसाठी ही जागा पूर्णपणे योग्य मानली जाते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. गुलाम नबी आझाद यांना पक्षाकडून जी वागणूक दिली, त्यानेही काँग्रेसचे नेते दुखावले आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार, अशी चर्चा सुरु झाली आहे.
जम्मूमध्ये शनिवारी काँग्रेसच्या जी 23 गटाची बैठक होत आहे. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा, हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा, कपिल सिब्बल, राज बब्बर, विवेक तन्खा आणि गुलाम नबी आझाद यांचा समावेश आहे. याठिकाणी “सेव द आइडिया ऑफ इंडिया” ही मोहीम लाँच करण्यात येणार आहे. हा काँग्रेस पक्षाचा अधिकृत कार्यक्रम नाही. एकीकडे राहुल गांधी दक्षिणेच्या दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे बंडखोर नेत्यांची ही एकजूट काँग्रेस पक्षासाठी चांगले लक्षण नसल्याची चर्चा आहे. जी 23 गटाने जम्मू काश्मीर प्रदेश काँग्रेस समितीच्या प्रमुखांना या शांती संमेलनात बोलावलेल नाही. यावरून हे स्पष्ट झाले आहे, की हे नेते पक्षाविरोधत बंड दर्शविण्यासाठी स्वतंत्र आघाडी करत आहेत.
या व्यतिरिक्त, राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदही राहुल गांधी यांचे निकटवर्ती सहाय्यक मानले जाणारे मल्लिकार्जुन खर्गे यांना देण्यात आले आहे, जे खरेतर आनंद शर्मा यांना द्यायाला हवे होते. त्यांचा अवघ्या एक वर्षाचा कार्यकाळ शिल्लक असताना, त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ते नाराज आहेत.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात काँग्रेस कार्यकारिणी समिती, खासदार, माजी केंद्रीय मंत्र्यांनी मिळून काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना एक पत्र लिहिले होते. त्यात पक्षांतर्गत काही बदलांची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. पक्षाला प्रभावी आत्मपरिक्षणाची आवश्यकता आहे. पक्षाला पूर्णवेळ कृतीशील आणि प्रभावी नेतृत्वाची गरज निर्माण झाली असल्याचे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी पत्रात म्हटलं होतं.
काँग्रेसच्या 23 नेत्यांनी मिळून गांधी यांना पत्र दिले होते. त्यामध्ये गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, कपील सिब्बल, शशी थरूर, भुपिंदर हुडा, मनिष तिवारी, विवेक तनखा, मुकुल वासनिक, विरप्पा मोईली, जतीन प्रसाद, पृथ्वीराज चव्हाण, पीजे कुरियन, अजय सिंह, रेणुका चौधरी, मिलिंद देवरा, राजेंदर भट्टल, राज बब्बर, अखिलेश प्रसाद सिंह, अरविंदर सिंग लव्हली, कुलदीप शर्मा, योगानंद शास्त्री, कुल सिंह ठाकूर आणि संदीप दीक्षित यांचा समावेश होता. या पत्रानंतर काँग्रेस कार्यकारणीची बैठक झाली होती. बैठकीनंतर अध्यक्षपदाच्या वादावर पडदा पडला होता. आता पुन्हा जी 23 नेते एकत्र आल्याने हा काँग्रेस पक्षासाठी जबर धक्का असणार आहे.