नवी दिल्ली : दिल्लीतील एका न्यायालयाने आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना आणि त्यांचा मुलगा कार्ती याला समन्स बजावले आहे. ईडीने या दोघांविरोधात दाखल केलेल्या चार्जशीटची दखल घेत हे समन्स बजावण्यात आले आहे.
विशेष न्यायाधीश एम. के. नागपाल यांनी या दोघांना ७ एप्रिलपर्यंत न्यायालयासमोर हजर राहण्यास सांगितले आहे. यामध्ये चिदंबरम, कार्ती आणि त्यांचे लेखापरीक्षक एस. एस. भास्कररारामन यांच्यासह इतरांच्या नावांचाही या चार्जशीटमध्ये उल्लेख आहे.
काय आहे आयएनएक्स माध्यम व्यवहार प्रकरण?
आयएनएक्स माध्यम व्यवहार पी. चिदंबरम अर्थमंत्री असताना २००७मध्ये झाला होता. यामध्ये आयएनएक्स या माध्यम समूहाला ३०५ कोटींची परदेशी गुंतवणूक मिळवून देण्यासाठी 'इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड' तर्फे मंजुरी देण्यात आली होती. ही मंजुरी देताना गैरव्यवहार केल्याचा ठपका चिदंबरम यांच्यावर आहे. १५ मे २०१७ला सीबीआयने याप्रकरणी खटला दाखल केला होता. तर २०१८ मध्ये सक्तवसुली संचालनालयाने मनी लाँड्रिगचा खटला दाखल केला होता.
२१ ऑगस्टला त्यांना पहिल्यांदा सीबीआयकडून अटक करण्यात आली. पण, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन देऊन दिलासा दिला होता. त्यानंतर ईडीकडून १६ ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती. ईडी प्रकरणात त्यांना चार डिसेंबर २०१९ला जामीन मिळाला होता.
हेही वाचा : निकिता तोमर हत्याकांड : तौसिफ आणि रेहान दोषी; शुक्रवारी जाहीर होणार शिक्षा