बिजनौर (उत्तरप्रदेश) : बिजनौरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर एका अल्पवयीन मुलाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. मुलगी आई-वडिलांच्या मागे त्यांच्या शेतात जात असताना एका मुलाने मुलीला जबरदस्तीने शेजारील शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. याबाबत पीडित मुलीने पालकांना माहिती दिल्यानंतर याप्रकरणी पीडित मुलीच्या पालकांच्या वतीने पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. पोलीस पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करत असूनमी पोलीस आरोपी अल्पवयीन मुलाचीही चौकशी करत आहेत.
आरोपी बाल न्यायालयात: यासंदर्भात एसपी ईस्ट धरम सिंह म्हणाले की, 11 जानेवारीला पीडितेच्या वडिलांनी फोनवरून मुलीवर बलात्कार झाल्याची माहिती दिली होती. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रकरणाचा तपास केला. पीडित मुलीला वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांकडून आरोपाच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे. पोलीस आरोपी अल्पवयीन मुलाची चौकशी करत आहेत. बालकाला बालसुधारगृहात पाठवण्याची तयारी सुरू आहे. वैद्यकीय अहवालाच्या आधारे मुलाला बाल न्यायालयात पाठवण्यात आले आहे. त्यानंतर त्याला बालसुधारगृहात पाठवले जाईल.
काय म्हटले आहे तक्रारीत: धामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या शेतकऱ्याने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तो पत्नीसह शेतात कामाला गेला होता. यादरम्यान मुलगीही त्यांच्यामागे गेली असता, अचानक वाटेत गावातील एका दहा वर्षाच्या मुलाने मुलीला दुसऱ्या शेतात नेले आणि तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. पीडित मुलीने घरी पोहोचून तिच्या पालकांना बलात्काराची माहिती दिली. यानंतर पीडित मुलीच्या आई व वडिलांच्यावतीने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर तपास केला आहे.
महाराष्ट्रातही घडली होती अशीच घटना: दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यात नैसर्गिक विधीला घराबाहेर गेलेल्या अल्पवयीन 16 वर्षीय तरुणीला फरफटत नेत नराधमाने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. ही घटना पालघरमधील एका आदिवासी पाड्यावर रविवारी (दि. ३) सायंकाळी घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका 24 वर्षीय नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहेत. पीडित तरुणीने वाडा पोलीस ठाण्यात नराधमाविरोधात अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली.
उपाय करण्याची गरज: त्यावरुन वाडा पोलीस ठाण्यातील जवानांनी आरोपीच्या विरोधात भादवी 376, लहान बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार ( पोक्सो ) गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. अशा प्रकारे अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना होत असल्याने चिंतेची बाब म्हणावी लागेल. अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी प्रबोधनात्मक उपाय करण्याचीही गरज निर्माण झाली आहे.
हेही वाचा: नैसर्गिक विधीला गेलेल्या अल्पवयीन तरुणीवर अत्याचार