नवी दिल्ली: 1999 मध्ये काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या IC-814 इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे पाच दहशतवाद्यांनी अपहरण केले होते त्यापैकी एक मिस्त्री जहूर इब्राहिम यास, 1 मार्च रोजी पाकिस्तानच्या कराचीमध्ये गोळ्या घालून ठार मारण्यात आल्याचे समोर आले आहे.
अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, जैश-ए-मोहम्मद दहशतवादी अनेक वर्षांपासून आयएसआयच्या संरक्षणाखाली कराचीमध्ये राहत होता. नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्लीकडे जाणाऱ्या भारतीय एअरलाइन्सचे 24 डिसेंबर 1999 रोजी भारतीय हवाई हद्दीत प्रवेश केल्यानंतर लगेचच अपहरण करण्यात आले होते.
हरकत-उल-मुजाहिदीन या संघटनेवरही अपहरणाचा आरोप असल्याची माहिती आहे. मुश्ताक अहमद जरगर, अहमद उमर सईद शेख आणि मसूद अझहर या तीन अतिरेक्यांची सुटका करणे हा अपहरणाचा हेतू होता. ओलिसांचे संकट सात दिवस चालले आणि सरकारने तीन अतिरेक्यांना सोडण्याचे मान्य केल्यावर ते संपले होते .