नवी दिल्ली - देशी बनावटीच्या दोन लसींनी मानवतेचे रक्षण करण्यास भारत सज्ज असल्याचे वक्तव्य पंतप्रधान मोदींनी आज केले. प्रवासी भारतीय दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या परिषदेत ते बोलत होते. तंत्रज्ञानाचा वापर करून गरीबांचे सक्षमीकरण करण्यासाठी देश करत असलेल्या प्रयत्नांची चर्चा जागतिक स्तरावर होत असल्याचेही मोदी म्हणाले.
लसीकरण कार्यक्रमाकडे संपूर्ण जगाचे लक्ष -
देशी बनावटीच्या दोन कोरोना लसीने मानवतेचे रक्षण करण्यासाठी भारत सज्ज आहे. भारताने याआधाही जगाला मदत करण्याचे काम केले असून पुन्हा मदत करण्यास तयार आहे. सबंध जग भारताच्या लसींची वाट पाहत असून देशात कशाप्रकारे लसीकरण कार्यक्रम राबवला जाईल, याकडेही संपूर्ण जगाचे लक्ष असल्याचे मोदी म्हणाले.
कोरोना महामारीतून आत्मनिर्भर होण्याची प्रेरणा मिळाली -
कोरोना महामारीच्या संकटातून भारताला आत्मनिर्भर होण्याची प्रेरणा मिळाल्याचे मोदी म्हणाले. भारत आधी पीपीई कीट, मास्क, व्हेंटीलेटर आणि टेस्टिंग किट आयात करत होता. मात्र, आता भारत या उत्पादनात आत्मनिर्भर झाला आहे. भारत दहशतवादाच्या विरोधात उभा राहील्यानंतर संपूर्ण जगात दहशवादी विरोधी लढण्याचं बळ निर्माण झालं, असे मोदी म्हणाले.