नवी दिल्ली : नववर्षाच्या पहिल्या दिवशी भारत आणि पाकिस्तानने आपापल्या अण्विक प्रकल्पांची यादी एकमेकांना दिली आहे. गेल्या ३० वर्षांपासून दरवर्षी ही माहितीची देवाण-घेवाण करण्यात येते. दोन्ही देशांमध्ये एकमेकांच्या अण्विक प्रकल्पांवर हल्ला न करण्याच्या करारांतर्गत ही माहिती देण्यात येते.
सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये काश्मीर आणि दहशतवाद या मुद्द्यांवरुन बराच तणाव वाढला आहे. मात्र तरीही ३० वर्षांपासूनची ही परंपरा अखंडपणे चालू ठेवण्यात आली आहे. यावर्षीही ही यादी दोन्ही देशांच्या दूतावासांमध्ये देण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. मंत्रालयाने ट्विट करत याबाबत माहिती दिली.
३० वर्षांपासूनची परंपरा..
भारत आणि पाकिस्तानदरम्यान ३१ डिसेंबर १९८८ला एक करार झाला होता. यानुसार, दरवर्षी एक जानेवारीला दोन्ही देशांनी आपापल्या अण्विक प्रकल्पांची यादी एकमेकांना देणे बंधनकारक आहे. १९८८मध्ये मंजूर झालेला हा करार, २७ जानेवारी १९९१पासून लागू करण्यात आला. यानंतर दरवर्षी न चुकता या कराराची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यंदाचे हे या कराराचे ३०वे वर्ष आहे.
हेही वाचा : पाकिस्तानने दिली भारतीय कैद्यांची यादी; ४९ नागरिकांसह २७० मच्छिमारांचा समावेश