नवी दिल्ली - कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आता तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी आपल्याकडच्या लहान मुलांचे लसीकरण करण्यावर भर दिला आहे. आता भारतातही लहान मुलांना लस देण्यात येणार आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरपासून लहान मुलांचं लसीकरण सुरू होऊ शकते, अशी माहिती एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली.
कोरोनाचा ज्येष्ठ नागरिकांना जास्त धोका असतो. ज्येष्ठ नागरिकांच्या तुलनेत लहान मुलांमध्ये कोरोनाची अगदी सौम्य लक्षणं आढळतात. लहान मुलांना कोरोनाची शक्यता अत्यंत कमी असते. त्यामुळे प्राधान्याने ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. आता लहान मुलांनाही लस देण्यात येणार आहे. विशेष म्हणेज फायजर लस टोचवण्यात येणार आहे. तसेच भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला मंजुरी मिळताच 2-18 वर्षांच्या मुलांना दिली जाईल. मान्यता मिळताच आम्ही लसीकरण सुरू करू. संपूर्ण प्रकियेसाठी 2 महिन्यांचा पाठपुरावा धरल्यास सप्टेंबरपर्यंत डेटा उपलब्ध होईल. सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत आपल्याकडे मुलांसाठी लस असतील, असे डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले.
तिसरी लाट थांबवणे आपल्या हातात आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन केल्यास व्हायरस पसरणार नाही. सर्वांनी कोरोनाचे सर्व नियम पाळले पाहिजेत आणि कोरोनाची अधिक रुग्ण असतील तेथे लॉकडाउन लागू करा आणि सर्वांचे लसीकरण करा, असे आवाहन गुलेरिया यांनी केले. याव्यतिरिक्त, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने नोवावॅक्सची क्लिनिकल चाचण्या जुलैमध्ये सुरू करण्याची योजना आखली आहे. नुकताच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत नोवावॅक्स लसीच्या संदर्भात एनआयटीआय आयुक्तचे सदस्य (आरोग्य) व्ही के पाल यांनी म्हटले होते, की नोवावॅक्स लसीच्या परिणामकारकतेसंबंधीचा डेटा उत्साहवर्धक आहे.
कोरोनापासून मुलांची काळजी कशी घ्यावी?
तिसऱ्या लाटेत सर्वाधिक त्रास लहान मुलांना होईल, असे म्हटलं जात आहे. भविष्यकाळ अनिश्चित असल्याने पालकांनी मुलांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. फक्त त्यांचा आहारच नाहीतर त्यांचा रोजचा नित्यक्रम आणि व्यायामाच्या सवयींकडेही लक्ष दिले पाहिजे, असे ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ. लतीका जोशी यांनी सांगितले.
- मुलांना स्वच्छ आणि आरोग्यदायी राहण्यास प्रोत्साहित करा.
- वारंवार हात धुण्यास किंवा स्वच्छ राहण्यास सांगा.
- ताजे, घरी शिजवलेले, निरोगी आणि पचण्याजोगे जेवण द्या.
- मुलांच्या आहारात ताज्या हिरव्या भाज्या आणि सर्व प्रकारच्या डाळींचा समावेश करा.
- बाहेरचे अन्न खाण्यापासून टाळा, विशेषत: जंक फूड.
- दररोजच्या आहारात ताजे फळे, दुग्धजन्य पदार्थ आणि फळांची संख्या वाढवा.
- मुलांना नारळपाणी आणि इतर निरोगी पेय पिण्यास सांगा.
- मुलांना श्वास व्यायाम, योग आणि प्राणायाम यांचा सराव करण्यासा सांगा.
- मुलांच्या सभोवताली सकारात्मक वातावरण ठेवा आणि त्यांना तणाव, चिंता आणि भीतीपासून दूर ठेवा.
- मुलांना मास्क आणि सॅनिटायझेशनची आवश्यकता समजावून सांगा. मास्कशिवाय त्यांना घराबाहेर पडू देऊ नका.
- कोणतीही लक्षणे आढळल्यास, ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.